राज्यस्तरीय विकासरत्न प्रेरणा पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न
भद्रावतीची शिफा पवार मुंबई व तेलंगणातील आसिफाबाद येथे पुरस्कृत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
समृद्धी पर्यटन सांस्कृतिक विकास सेवा ट्रस्ट, मुंबई यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय विकासरत्न प्रेरणा पुरस्कार व समृद्धी कला सादरीकरण सोहळा २०२६ मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यात भद्रावतीची चिमुकली शिफा मंगेश पवार हिला मुंबई येथे राज्यस्तरीय विकासरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या भव्य सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून मा. आमदार प्रकाशदादा सर्वे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संपादन मनोहर नाईक यांनी केले, तर स्वागताध्यक्ष म्हणून मान्यवरांनी उपस्थितांचे स्वागत केले.
या प्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. यामध्ये शिफा मंगेश पवार यांना राजकीय विकासरत्न प्रेरणा पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. हा सन्मान अभिनेत्री मीनाक्षी पाखरे आणि मंगेश अनंत नाईक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
मुंबईतील कांदिवली येथे आयोजित या कार्यक्रमात शिफा पवार यांना विशेष आमंत्रित करून गौरविण्यात आले. पुरस्कार स्वीकारताना त्यांनी आनंद व्यक्त करत आयोजकांचे आभार मानले. कार्यक्रमात विविध सांस्कृतिक सादरीकरणांनी उपस्थितांचे मनोरंजन केले. संपूर्ण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
याशिवाय, दिनांक २९ एप्रिल रोजी तेलंगणातील आसिफाबाद (गोएगाव) येथे आयोजित एका विशेष समारंभात महाकवी वामनदादा कर्डक यांच्या स्मरणार्थ राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कारानेही शिफा पवार यांना सन्मानित करण्यात आले. या वेळी तिने “मी रमाई बोलते” या एकपात्री नाटिकेत उत्कृष्ट अभिनय सादर करून उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
भद्रावतीसह जिल्ह्यातील नागरिकांकडून शिफा पवार हिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



