प्रबोधनातून बहुजन ऐक्यात फूट पाडण्याच्या प्रवृत्तीवर बोके यांचा प्रहार
जिवतीत आंबेडकर जयंतीचा जल्लोष; भव्य मिरवणूक, संगीत कार्यक्रमाने रंगत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक समिती, जिवती यांच्या वतीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती गुरुवार, दि.३० एप्रिल २०२६ रोजी उत्साहात साजरी करण्यात आली. पंचशील बुद्धविहार तसेच डॉ. आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळील ध्वजरोहण मान्यवरांच्या हस्ते झाले. सायंकाळी पंचशील बुद्धविहार ते आंबेडकर पुतळा अशी भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत सहभागी नागरिकांनी शुभ्र वस्त्र परिधान करून उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
प्रबोधन कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार देवराव भोंगळे यांच्या हस्ते झाले. प्रमुख मार्गदर्शक अकोल्याचे प्रसिद्ध लेखक व व्याख्याते प्रेमकुमार बोके यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सर्व मानवजातीसाठी असल्याचे सांगत बहुजन समाजात फूट पाडण्याच्या प्रवृत्तीवर भाष्य केले. तसेच शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. आंबेडकर व अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती विशिष्ट घटकांपुरत्या मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा बाबासाहेबांचा संदेश आत्मसात केल्यास देशात मोठे परिवर्तन घडेल आणि बहुजन समाज सशक्त बनेल, त्यामुळे बहुजन समाजाने आंबेडकर विचार अंगीकारण्याची गरज असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.
आमदार देवराव भोंगळे यांनी आपल्या भाषणात “शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे” असे सांगत प्रत्येकाने शिक्षण घेऊन समाजाच्या उन्नतीसाठी त्याचा उपयोग करावा, असे आवाहन केले. बाबासाहेबांनी संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी आयुष्य वेचले असून त्यांच्या विचारांची कास धरणे काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमात रमाबाई महिला मंडळाच्या सदस्यांनी स्वागतगीत सादर केले तसेच भीमगीतांवर लेझीमच्या तालावर आकर्षक सादरीकरण केले. दरम्यान गुडशेला येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व अण्णाभाऊ साठे यांच्या संयुक्त पुतळ्याची उभारणी केल्याबद्दल गुडशेला वासियांचे परमडोली व मुकदमगुडा वासियांनी शाल व निळे दुप्पटे टाकून सत्कार केला.
यावेळी महेश देवकते, निशिकांत सोनकांबळे, गजानन जुमनाके, गोविंद टोकरे, राजेश राठोड, अशफाक शेख, सुग्रीव गोतावळे, डॉ. अंकुश गोतावळे, जमालुद्दीन शेख, बालाजी सोनकांबळे, पंढरी राठोड, मारुती नैताम, ममता जाधव, प्रिया सोनकांबळे, सुजाता भगत, देविदास साबने स्मारक समितीचे व्यँकटी कांबळे, शरद वाटोरे भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष दिपक साबने, गिरीश कांबळे, गणेश कांबळे, लिंबादास पतंगे, किसन कांबळे, अमोल कांबळे, प्रभाकर कांबळे, प्रदीप काळे यांचेसह पुनागुडा, माराई पाटण, शेणगाव, येल्लापुर, परमडोली, मुकदमगुडा यासह विविध गावातून महिला पुरुष यांची उपस्थिती होती.
सूत्रसंचालन नभीलास भगत, प्रास्ताविक निशिकांत सोनकांबळे यांनी केले तर आभार चंदू रोकडे यांनी मानले. भोजनानंतर रात्री संभाजी ढगे व अंजली घोडके (लातूर) यांच्या संचाचा प्रबोधनात्मक संगीत कार्यक्रम रंगला. या कार्यक्रमालाही नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.



