ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अपघाताच्या खाईत सेलूकरांना ढकलणारे खोदकाम; प्रशासनाचे दुर्लक्ष

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

शहरातील मेडिकल चौक ते धोऱाड रस्त्यावर पाणीपुरवठा योजनेच्या नावाखाली करण्यात आलेले खोदकाम नागरिकांच्या जीवावर बेतत आहे. चार महिन्यांपूर्वी पाइपलाइन टाकण्यासाठी रस्त्याच्या कडेला मोठी नाली खोदण्यात आली होती. मात्र काम पूर्ण झाल्यानंतरही रस्ता पूर्ववत करण्याकडे ठेकेदाराने दुर्लक्ष केल्याने हा मार्ग अक्षरशः ‘अपघाताचा सापळा’ बनला आहे.

दररोज शेकडो वाहनांची वर्दळ असलेल्या या रस्त्यावर खोदलेल्या नालीत दुचाकींचे टायर अडकून अनेक वाहनधारक पडल्याच्या घटना घडल्या आहेत. काहींना किरकोळ, तर काहींना गंभीर दुखापती झाल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. विशेषतः रात्रीच्या वेळी परिस्थिती अधिक धोकादायक ठरत असून मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त होत आहे.

या रस्त्यावर आधीच अरुंद जागा असल्याने खोदकामामुळे वाहतुकीची कोंडी वाढली आहे. समोरासमोर वाहने आल्यास चालकांना कसरत करावी लागत असून नागरिकांचा संताप दिवसेंदिवस वाढत आहे. “काम सुरू करताना मोठमोठे दावे केले, पण आता नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केली.

यासंदर्भात नगरपंचायत प्रशासनाकडे विचारणा केली असता, “कंत्राटदाराचे मजूर कमी झाल्याने काम रखडले,” असे कारण देण्यात येत आहे. मात्र नागरिकांचा सवाल कायम आहे—मजूर कमी झाले म्हणून नागरिकांनी जीव धोक्यात घालायचा का?

चार महिन्यांपासून उघडी पडलेली नाली, वाढते अपघात आणि वाहतुकीची कोंडी यामुळे नागरिकांनी तातडीने रस्ता दुरुस्तीची मागणी केली आहे. प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन योग्य ती उपाययोजना करावी, अन्यथा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये