शेतकऱ्यांना ठिबक सिंचनासाठी आता ९० टक्के अनुदान
जिवती तालुक्यात 'डिजिटल चलन' प्रायोगिक तत्त्वावर लागू

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-२ अंतर्गत आता अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमधील शेतकऱ्यांसाठी ठिबक सिंचन घटकासाठी ९०% अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे, भांडवलाअभावी सिंचन सुविधांपासून वंचित राहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी चंद्रपूर जिल्यातील जिवती तालुक्यातील pocra मध्ये समाविष्ट गावांना भारतीय रिझर्व्ह बँकेचे ‘सेंट्रल बँक डिजिटल चलन (P-CBDC)’ प्रायोगिक तत्त्वावर वापरले जाणार आहे.
या नवीन प्रणालीमुळे शेतकऱ्यांना आता सुरुवातीला स्वतःचे पैसे खर्च करण्याची (Back-Ended Subsidy) अट शिथिल करण्यात आली असून, त्याऐवजी ‘Front-Ended Subsidy’ द्वारे थेट लाभ मिळणार आहे.
**अशी असेल प्रक्रिया:**
१. इच्छुक लाभार्थ्यांनी प्रकल्पाच्या डीबीटी पोर्टलवर ठिबक सिंचन घटकासाठी अर्ज करावा.
२. अर्ज करताना ‘P-CBDC द्वारे अनुदान वितरण’ हा पर्याय निवडावा.
३. यासाठी शेतकऱ्याकडे स्मार्टफोन आणि स्वतःचा मोबाईल क्रमांक असणे आवश्यक आहे.
४. Google Play Store वरून ‘PNB Digital Rupee App’ डाउनलोड करून नोंदणी करावी लागेल. यासाठी पंजाब नॅशनल बँकेत स्वतंत्र खाते उघडण्याची गरज नाही.
५. पूर्वसंमती मिळाल्यावर अनुदानाच्या रकमेचे ‘डिजिटल टोकन’ शेतकऱ्याच्या मोबाईल ॲपवर उपलब्ध होईल.
६. हे टोकन नोंदणीकृत विक्रेत्याकडे स्कॅन करून शेतकरी ठिबक संच खरेदी करू शकतील.
**महत्वाच्या अटी:**
ठिबक सिंचन संच बसवल्यानंतर त्याचे जिओ-टॅगिंग आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांमार्फत मोका तपासणी होणे अनिवार्य आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच संबंधित विक्रेत्याला त्या टोकनची रक्कम प्रत्यक्ष प्राप्त होईल. जर विहित मुदतीत काम पूर्ण झाले नाही, तर ते डिजिटल टोकन परत (Refund) केले जाईल.
या सुविधेमुळे अल्पभूधारक आणि गरजू शेतकऱ्यांना आर्थिक ओझ्याशिवाय आधुनिक सिंचन पद्धतीचा अवलंब करता येणार आहे. अधिक माहितीसाठी स्थानिक कृषी सहाय्यक किंवा कृषी विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
एम.जी. गावडे तालुका कृषी अधिकारी



