जिवती तालुक्यातील ३० गावांचा पालटणार चेहरामोहरा
‘पोकरा २.०’ अंतर्गत शेळीपालन, पाइप आणि पंपासाठी भरघोस अनुदान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
तालुका कृषी अधिकारी एम. जी. गावडे यांचे आवाहन; ५ हेक्टरच्या आतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा
जिवती :- हवामान बदलामुळे शेती व्यवसायात होणारे नुकसान टाळून शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाचे साधन मिळवून देण्यासाठी राज्य शासनाचा ‘नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प’ (POCRA) टप्पा २.० आता जिवती तालुक्यात प्रभावीपणे राबविला जात आहे. या प्रकल्पांतर्गत आता नोंदणीसाठी ‘फार्मर आयडी’ची अट शिथिल करण्यात आली असून, आधार कार्डाच्या आधारे थेट नोंदणी सुरू झाली आहे. तालुक्यातील ३० गावांमधील पात्र शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिवतीचे तालुका कृषी अधिकारी – एम. जी. गावडे यांनी केले आहे.
■ ५ हेक्टरची मर्यादा आणि सुलभ नोंदणी
पूर्वी या योजनेचा लाभ घेण्यासाठी ‘फार्मर आयडी’ अनिवार्य होता, ज्यामुळे दुर्गम भागातील अनेक शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणी येत होत्या. मात्र, आता जिवती तालुक्यातील समाविष्ट गावांमधील ज्या शेतकऱ्यांचे एकूण क्षेत्र *५ हेक्टर पेक्षा कमी* आहे, अशा सर्व अल्प व अत्यल्प भूधारकांसाठी पोर्टल खुले करण्यात आले आहे. शेतकरी आता थेट आपल्या आधार कार्डाच्या आधारे अधिकृत पोर्टलवर नोंदणी करून अर्जाची प्रक्रिया पूर्ण करू शकतात.
*■ या घटकांसाठी मिळणार अर्थसाहाय्य*
पोकरा टप्पा २.० मध्ये वैयक्तिक लाभार्थ्यांसाठी घटकांची व्याप्ती वाढवण्यात आली आहे:
**सिंचन व पाणी व्यवस्थापन:* शेतात पाणी नेण्यासाठी *पाइप (Pipes)*
, १० एचपी क्षमतेपर्यंतचे *विद्युत पंप*, *वैयक्तिक शेततळे*, आणि *विहीर पुनर्भरण*.
*सूक्ष्म सिंचन:* *ठिबक सिंचन*, *तुषार सिंचन (Sprinkler) आणि मिनी स्प्रिंकलर*.
**जोडधंदा व पशुपालन:* ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी *शेळीपालन*, *रेशीम उद्योग* आणि *मत्स्यपालन*.
*फलोत्पादन व वृक्ष लागवड:* नवीन *फळबाग लागवड*, *वृक्ष लागवड*, आणि *बांबू लागवड*.
*संरक्षित व सेंद्रिय शेती:* *शेडनेट*, *पॉलिहाऊस* व लागवड साहित्य, तसेच *गांडूळ खत/नाडेप युनिट*.
*■ तालुक्यातील समाविष्ट गावे*
जिवती तालुक्यातील खालील गावांचा या प्रकल्पात समावेश आहे:
मराईपाटण, आंबेझरी, पाटण, टाटाकोहाडा, हिमायतनगर, नंदप्पा, सोरेकसा, शेडववाही, बाबापूर, पिट्टीगुडा-१, पिट्टीगुडा-२, राहपल्ली बु., पल्लेझरी, पूनागुडा, खडकी हिरापूर, राहपल्ली खु., धर्मराम, कुसुबी, चिखली बु., भाई पठार, गोविंदपूर, मरकागोंदी, शेणगाव, टिटवी, जनकापूर, गणेरी, डोंगरगाव, भोकसापूर भारी इ. गावे आहेत.
*■ अर्ज प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रे*
इच्छुक शेतकऱ्यांनी शासनाच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन स्वतःचा मोबाईल क्रमांक आणि आधार क्रमांक वापरून अर्ज नोंदवायचा आहे.
👉 *पोर्टल लिंक:* https://dbt-ndksp.mahapocra.gov.in
*आवश्यक कागदपत्रे:*
* ७/१२ आणि ८-अ उतारा.
* वनपट्टा प्रमाणपत्र, 7/12 (असल्यास).
* आधार कार्ड (मोबाईल नंबर लिंक असलेले).
* जातीचा दाखला (लागू असल्यास).
*”शेतकऱ्यांनी संधी गमावू नये” *पोकरा योजनेचा दुसरा टप्पा हा जिवती तालुक्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी महत्त्वाचा आहे. जिवती तालुक्यातील दुर्गम भागातील 30 गावांसाठी ही मोठी संधी आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया आधार बेस नोंदणीमुळे आता अर्ज करणे अत्यंत सोपी झाली असून, पात्र शेतकऱ्यांनी विनाविलंब आपले अर्ज ऑनलाईन सादर करावेत. तालुक्यातील निवडक 30 गावांतील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घेऊन आपली शेती समृद्ध करावी. काही अडचण असल्यास गावपातळीवरील कृषी सहाय्यकांशी त्वरित संपर्क साधावा.”*
– एम. जी. गावडे, तालुका कृषी अधिकारी, जिवती.



