बळीराज पांदण रस्ता योजनेला गती द्या, कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण करा _ आ. जोरगेवारांचे निर्देश..
उपविभागीय कार्यालयात आढावा बैठकय, ७८ पांदण रस्त्यांच्या कामांना येणार वेग

चांदा ब्लास्ट
ग्रामीण भागातील शेती आणि गावांमधील दळणवळण सुलभ करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘बळीराज पांदण रस्ता’ योजनेला गती देण्याचे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी दिले. उपविभागीय कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत पांदण रस्त्यांच्या कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
या बैठकीला उपविभागीय अधिकारी विशाल मेश्राम, तहसिलदार विजय पवार, गट विकास अधिकारी संगीता भांगरे, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता प्रकाश कारेगोरा, अभियंता आंबटकर, यांच्यासह भुमिअभिलेख विभाग आणि संबधिकत विभागाच्या अधिका-यांची उपस्थिती होती. तसेच यावळी भारतीय जनता पक्षाचे माजी महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, महामंत्री नामदेव डाहुले, विनोद खेवले, ऋषभ दुपारे, नकुल वासमवार, अमोल शेंडे, राशिद हुसेन आदिंची उपस्थिती होती.
या बैठकीत चंद्रपूर मतदारसंघातील पांदण रस्त्यांच्या बांधकामांची सद्यस्थिती, अडचणी आणि पुढील नियोजनावर चर्चा करण्यात आली. यावेळी मतदारसंघातील गावांचे सहा क्लस्टरमध्ये विभाजन करण्यात आले असून, प्रत्येक क्लस्टरमध्ये ५ ते १० गावे समाविष्ट करण्यात आली आहेत. या अभियानांतर्गत एकूण ७८ पांदण रस्त्यांची उभारणी करण्यात येणार आहे.
यावेळी आ. जोरगेवार म्हणाले की, “पांदण रस्ते हे ग्रामीण भागातील शेतकर्यांसाठी जीवनरेखा आहेत. शेतीमालाची वाहतूक, शेतात जाण्या-येण्याची सोय आणि गावांमधील संपर्क सुधारण्यासाठी हे रस्ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे या कामांमध्ये कोणतीही दिरंगाई किंवा हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही.”
ते पुढे म्हणाले की, “प्रत्येक रस्ता दर्जेदार असावा. केवळ काम पूर्ण करणे हा उद्देश नसून, दीर्घकाळ उपयोगी पडेल असे काम व्हावे, यासाठी अधिकार्यांनी काटेकोरपणे देखरेख करावी. कामांमध्ये पारदर्शकता ठेवून वेळेत पूर्ण करण्यावर विशेष भर द्यावा.” तसेच, “प्रत्येक क्लस्टरनिहाय नियोजन करून कामांना गती द्यावी. ज्या ठिकाणी अडचणी आहेत, त्या तातडीने सोडवून कामे सुरू ठेवावीत. शेतकर्यांना रस्त्यांअभावी कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी प्रशासनाने सक्रिय भूमिका घ्यावी,” अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या. बैठकीला संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.



