चंद्रपूर जिल्ह्यातील रेल्वे सुविधा व अन्य विषयांबाबत रेल्वेमंत्र्यांशी भेट
रेल्वे मंत्र्यांसोबतची चर्चा फलदायी - हंसराज अहीर

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर : जिल्ह्यातील रेल्वे विषयक समस्यांबाबत पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची नवी दिल्ली येथे दि. 22 एप्रिल 2026 रोजी भेट घेऊन चर्चा केली, या भेटीप्रसंगी यापूर्वी झालेली बैठक व या भेटीदरम्यान रेल्वे मंत्र्यांनी जिल्ह्यातील रेल्वे सुविधांबाबत दिलेल्या आश्वासनाचे अहीर यांनी मंत्री महोदयांना स्मरण करून दिले.
या भेटीत बल्लारशाह येथील पीटलाईनचे कार्य पूर्ण झाल्यानंतर मुंबई-पुणे रेल्वे सेवा पूर्ववत करून या गाडीच्या फेर्या वाढविण्यासाठी सहमती दर्शवली होती. तसेच बल्लारशाह पीटलाईनचा पुरेपूर उपयोग घेण्याकरिता चंद्रपूर-मुंबई, पुणे, कोलकाता करीता रेल्वे गाड्या लवकरच सुरू करण्यात येतील असे आश्वासन दिल्याचे या भेटीत अहिर यांनी मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिले. बल्लारशाह – लोकमान्य तिलक मुंबई नवीन रेल्वे लवकरच सुरु होणार असून पुणे, कोलकाता व अन्य महत्वपूर्ण गाड्या सुरु करण्याविषयी ठोस आश्वासन दिले होते त्याची पुर्तता लवकरात लवकर करण्यात यावी याबाबत या भेटीमध्ये मा. रेल्वे मंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा झाली.
या व्यतिरिक्त अहीर यांनी नंदीग्राम एक्सप्रेसच्या कोचची (डब्बे) संख्या वाढवून या ट्रेनची गती वाढविण्यात यावी, तिसऱ्या व चैथ्या लाईनच्या कामास गती देण्यात यावी याबोबरच नागपूर-सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेस अमरावती येथून बल्लारशाह मार्गे तसेच दक्षिण एक्सप्रेस चा सोलापूर पर्यंत विस्तार करणे व अन्य रेल्वे समस्या तसेच जिल्ह्यातील रेल्वे प्रवास्यांना मागील काही वर्षांपासून पर्याप्त रेल्वे सुविधा अभावी होत असलेल्या मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रासांविषयी सुद्धा या भेटीमध्ये हंसराज अहीर यांनी उहापोह केला.
रेल्वे मंत्र्यांशी झालेली ही भेट फलदायी झाली असल्याचे सांगत रेल्वे मंत्रालय ३ ते ४ महत्वपूर्ण गाड्यांविषयी सकारात्मक असून भेटीदरम्यान चर्चिल्या गेलेल्या विषयावर सुद्धा रेल्वे मंत्र्यांची भूमिका सुद्धा सहकार्यात्मक राहिली. याप्रसंगी रेल्वे मंत्र्यांनी बल्हारष्शाह- लोकमान्य तिलक मुंबई गाडीच्या (22109-22110) फेऱ्या वाढविण्याबाबत सुद्धा भरीव आश्वासन दिले असल्याचे हंसराज अहीर यांनी म्हटले आहे.



