सततच्या अपघात-हल्ल्यांनी गोंडपिपरी तालुका हादरला
अपघातांची मालिका सुरुच, कुटुंबे उध्वस्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
“वेळ, निष्काळजीपणा, राग आणि मनाचा कहर”
गोंडपिपरी :_ तालुक्यात गेल्या काही दिवसांत घडलेल्या सलग अपघात आणि हिंसक घटनांनी संपूर्ण परिसराला अक्षरशः हादरवून सोडले आहे. वेग, राग, मनावरील ताबा आणि निष्काळजीपणाच्या या बेफाम साखळीने अनेक निष्पापांचे जीव घेतले असून अनेक कुटुंबांचे संसार एका क्षणात उद्ध्वस्त झाले आहेत. प्रत्येक घटनेमागे केवळ एक अपघात किंवा एक गुन्हा नाही, तर एक तुटलेलं घर, हरवलेला आधार, आणि आयुष्यभराची न भरून येणारी पोकळी उभी आहे. आजघडीला या अपघात, हल्ल्यांच्या मालिकेमुळे गोंडपिपरी तालुक्यात भीती, हळहळ आणि असुरक्षिततेची भावना स्पष्टपणे जाणवत आहे.
या दुर्दैवी घटनांची मालिका १७ एप्रिल रोजी वेडगाव परिसरात पहाटे सुरू झाली. दहावीचा विद्यार्थी ओम अनिल धुडसे (वय १५) हा आपल्या मित्रासोबत सकाळी फिरण्यासाठी घराबाहेर पडला होता. भरधाव पिकअपने दिलेल्या जोरदार धडकेत ओमचा जागीच मृत्यू झाला. पहाटेच्या शांततेत घडलेल्या या भीषण घटनेने संपूर्ण गाव सुन्न झाले.
यानंतर दुसऱ्या दिवशी १८ एप्रिल रोजी चंद्रपूर–कोठारी मार्गावरील आक्सापूर जंगल परिसरात आणखी एक भीषण अपघात घडला. शिक्षक शिमोन डोनू गणवीर (वय ५३) हे आपल्या मुलगा आणि मुलीसह प्रवास करत असताना भरधाव पिकअपने त्यांच्या कारला जबर धडक दिली. अपघात इतका भीषण होता की शिमोन गणवीर यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचा मुलगा आणि मुलगी गंभीर जखमी झाले असून ते उपचारासाठी झुंज देत आहेत.
तिसऱ्या दिवशी १९ एप्रिल रोजी वढोली येथे किरकोळ वादातून निर्माण झालेल्या भांडणात वैभव साईनाथ आळे (वय २०) या तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. एका क्षणाच्या रागाने एका तरुणाचं आयुष्य हिरावलं. गंभीर जखमी अवस्थेत उपचार सुरू असताना २० एप्रिल रोजी पहाटे त्याचा मृत्यू झाला. याच दिवशी दुपारी वढोली बसस्थानक परिसरात भरधाव कारने रामा विठोबा बुटले (वय ५५) यांना जोरदार धडक दिली. ते गंभीर जखमी झाले आणि उपचारासाठी नेत असताना त्यांचा मृत्यू झाला.
याच घटनांच्या दरम्यान, धामणगाव येथील चांगदेव बोमकंट्टीवार यांचा अपघातानंतर नागपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. याच कालावधीत फुरडी-हेटी मार्गावरील ट्रॅक्टर अपघात,लाठी आणि गोंडपिपरी परिसरात आढळलेले मृतदेह, या घटनांनी अपघातांच्या दुर्दैवी मालिकेत भर घातली आहे. या घटनांमध्ये काही जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातांची ही साखळी थांबण्याची चिन्हे दिसत नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
*काही अनुत्तरित प्रश्न*
या सर्व घटनांनी काही गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत — रस्ते इतके असुरक्षित कां झाले आहेत.? वेगावर नियंत्रण कां राहत नाही.? आणि किरकोळ वाद इतक्या सहज जीवघेण्या हिंसाचारात कां बदलतात.? मानवी जीवनाची किंमत इतकी कमी कां झाली आहे.? सुरजागडच्या भरधाव वाहनांवर नियंत्रण कां नाही.?
*उरल्या फक्त आठवणी..!*
पोलिसांकडून सर्व घटनांचा तपास सुरू आहे. काही ठिकाणी आरोपींचा शोध घेतला जात आहे. मात्र या सर्व प्रक्रियेनंतरही गेलेले जीव परत येणार नाहीत. मागे उरतात त्या फक्त आठवणी. पाणावलेले डोळे आणि आयुष्यभराची वेदना. आज गोंडपिपरी तालुक्यासमोर एक मोठं वास्तव उभं आहे— वेग, राग, मनावरील ताबा आणि निष्काळजीपणा जर थांबला नाही, तर ही मृत्यूंची मालिका अशीच अविरतपणे सुरू राहील, यात शंका नाही. मात्र, या सर्व घटनांना जबाबदार कोण..?, आपण स्वतः, समाज की प्रशासन..?



