काळाचा अजब खेळ! पतीच्या निधनानंतर काही तासांतच पत्नीनेही सोडला जीव
ब्रह्मपुरीत ठाकरे दांपत्यावर एकाच दिवशी अंत्यसंस्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
ब्रह्मपुरी :- ‘जन्मोजन्मीची सोबत’ या उक्तीचा प्रत्यय देणारी एक अतिशय हृदयद्रावक आणि चटका लावून जाणारी घटना ब्रह्मपुरी येथे घडली आहे. सेवानिवृत्त शिक्षक बुधाजी विस्तारी ठाकरे (८५) यांचे वृद्धापकाळाने निधन झाल्यानंतर, अवघ्या काही तासांतच त्यांच्या पत्नी सौ. वनिता उर्फ कांताबाई बुधाजी ठाकरे (७९) यांनीही प्राण सोडले. या दुःखद घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधाजी ठाकरे यांचे काल, १५ एप्रिल २०२६ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले होते. पतीच्या निधनामुळे संपूर्ण ठाकरे कुटुंब दुःखात असतानाच, आज १६ एप्रिलच्या पहाटे ५:३० वाजताच्या सुमारास त्यांची पत्नी सौ. वनिता ठाकरे यांचीही प्राणज्योत मालवली. पतीच्या निधनाचा विरह सहन न झाल्यानेच त्यांचे निधन झाल्याची भावना व्यक्त होत आहे. आयुष्यभर एकमेकांना साथ देणाऱ्या या दांपत्याने जातानाही एकमेकांची सोबत सोडली नाही, या भावनेने उपस्थित जनसमुदाय हेलावून गेला. पती-पत्नीच्या एकापाठोपाठ झालेल्या निधनामुळे ठाकरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आज सकाळी १२:०० वाजताच्या सुमारास वडसा रोडवरील भूतीनाला स्मशानभूमी येथे दोन्ही पार्थिवांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. एकाच वेळी पती-पत्नीला अखेरचा निरोप देताना उपस्थितांचे डोळे पाणावले होते.
बुधाजी ठाकरे हे सेवानिवृत्त शिक्षक असल्याने त्यांचा मोठा मित्रपरिवार आणि विद्यार्थी वर्ग आहे. एक आदर्श शिक्षक आणि मनमिळावू व्यक्तिमत्व म्हणून ते परिचित होते. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीनेही जगाचा निरोप घेतल्याने, ही घटना ब्रह्मपुरी शहरात चर्चेचा आणि दुःखाचा विषय ठरली आहे. त्यांच्या पश्चात मुलाबाळांसह मोठा आप्तपरिवार आहे.



