ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जातिभेदाचा मोडून कणा…भीमजयंती पुन्हा पुन्हा..!

_विहिरगावातील युवकांचे बाबासाहेबांना अभिवादन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपिपरी तालुक्यापासून हाकेच्या अंतरावर असलेलं एक छोटसं गाव. जेमतेम शंभरेक कुटुंबसंख्या. ज्या गावात आदिवासी आणि इतर मागास प्रवर्गातील लोकांची वस्ती. या गावात औषधालाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जन्म घेतलेल्या जातीचा किंवा धर्मांतर केलेल्या धर्माचा व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. मात्र आम्ही “भीमाची लेकरं” आहोत आणि त्यांच्यामुळेच आमचे जीवन सफल होत आहे, हा विचार मनात रुजवून, जातिभेदाची सारी बंधने झिडकारून, कोणाच्याही दबावात न येता, आनंदाने, मागील चार वर्षांपासून मोठ्या जल्लोषात भीमजयंती साजरी केली जात आहे. बाबासाहेबांच्या विचारांनी प्रेरित तरुणाईच्या एकात्मतेच दर्शन घडविणारं हे गाव…विहिरगाव.

    १४ एप्रिल रोजी बौद्ध बांधव निळा ध्वज फडकावून मोठ्या थाटामाटात भीम जयंती साजरी करतात. डीजे आणि ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढली जाते. या दिवसाला एक सणाचे स्वरूप प्राप्त होते. आजघडीला, सगळीकडे भीमजयंती फक्त बौद्ध समाजच साजरी करतात अशी भावना रुजली असताना, मात्र गोंडपिपरी तालुक्यातील विहिरगाव हे गाव अपवाद ठरले आहे. या गावातील युवक एकत्र येत, बाबासाहेब विचारांचे अनुकरण करीत भीमजयंती आनंदाने साजरी करतात. मागील चार वर्षापासून हा उपक्रम या गावात सुरू असून, सर्व ग्रामस्थ मोठ्या उत्साहाने सहभाग घेतात.

यावर्षी सुद्धा विहिरगाव येथील युवकांनी एकत्र येत बाबासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन गावात भीमजयंती साजरी केली. गावातील मुख्य चौकात विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर संपूर्ण गावात रॅली काढण्यात आली आणि सामूहिक भोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

विहिरगाव या छोट्याश्या गावात “जातिभेदाचा मोडून कणा…भीमजयंती पुन्हा पुन्हा..!” साजरी करण्याचा मानस शरद गुडपल्ले, राकेश मडावी, भाविक झाडे, नरेंद्र उरवेते, मनोज कोवे, आनंदराव झाडे, कार्तिक चौधरी यांच्यासह गावातील युवकांनी व्यक्त केला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये