ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चांदागडच्या शेरणीचा गौरव; राणी हिराई जन्मोत्सव रंगणार

१९ ते २० एप्रिल रोजी चंद्रपूरमध्ये दोनदिवसीय सांस्कृतिक महोत्सव

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

जिवती :- गोंडवाना इतिहासातील पराक्रमी महिला शासक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजमाता राणी हिराई यांच्या जन्मोत्सवाचे आयोजन यंदा प्रथमच शासकीय स्तरावर करण्यात येत आहे. राजमाता राणी हिराई बहुउद्देशीय सेवा समिती, चांदागड यांच्या वतीने १९ व २० एप्रिल रोजी कोहिनूर तलाव व सोमेश्वर मंदिर परिसरात दोनदिवसीय सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्याचे माजी वने, मत्स्यव्यवसाय व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून या महोत्सवाला शासकीय स्वरूप प्राप्त झाले असून, दोन दिवस गोंडीयन संस्कृतीचे वैभवशाली दर्शन घडणार आहे.

या उत्सवात गोंडी संगीत, नृत्य, वादन, लोककला, पारंपरिक हस्तकला व वनउत्पादनांची प्रदर्शने आयोजित करण्यात येणार आहेत. यामुळे गोंडकालीन संस्कृतीला चालना मिळणार असून स्थानिक कलाकारांना सशक्त व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.

राजमाता राणी हिराई यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे तत्कालीन चांदागड व आजच्या चंद्रपूर शहराला धार्मिक, सांस्कृतिक व ऐतिहासिक ओळख प्राप्त झाली. माता महाकाली मंदिर, गोंड राजे बिरशहा महाराज यांची समाधी यांसारख्या वास्तूंमध्ये त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा व नव्या पिढीपर्यंत हा इतिहास पोहोचावा, यासाठी हा जन्मोत्सव महत्त्वाचा ठरणार आहे.

सांस्कृतिक कार्य विभागाकडून या उपक्रमासाठी निधी मंजूर करण्यात आला असून शासन निर्णयानुसार कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे.

असे असणार कार्यक्रम :

१९ व २० एप्रिल २०२६ : दिवसभर वनउत्पादने व हस्तकला प्रदर्शने व विक्री

२० एप्रिल २०२६ | सायं. ५ वाजता : समाजप्रबोधन व सांस्कृतिक महोत्सव

घुसाळी नृत्य, गोंडी डेमसा, पारंपरिक सांस्कृतिक झाक्या, किंगरी वाद्य, सनई वादन, गोंडी संगीत, घोडेस्वार नृत्य, जल–जंगल–जमीन एकांकीका, महिला गोंडी रेला नृत्य आदी कार्यक्रमांचे सादरीकरण

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये