देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताहाचे भव्य समारोप; जनसेवेच्या उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात रक्तदानाचा नवा विक्रम; ३,२२६ रक्तदात्यांचे महादान : २ हजारांहून अधिक रुग्णांना उपचार : ८३ गंभीर रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया

चांदा ब्लास्ट
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून दि. १५ जुलै ते २४ जुलै या कालावधीत चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात ‘देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताह’ मोठ्या उत्साहात आणि जनसहभागातून पार पडला. दहा दिवस चाललेल्या या सेवा सप्ताहात आरोग्य, समाजसेवा, पर्यावरण संवर्धन, धार्मिक-सामाजिक उपक्रम आणि जनकल्याणकारी कार्यक्रमांची प्रभावी सांगड घालत हजारो नागरिकांपर्यंत विविध उपक्रम पोहोचविण्यात आले.
सेवा सप्ताहांतर्गत मतदारसंघातील ५६ ठिकाणी भव्य रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या शिबिरांना नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभत चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात रक्तदानाचा नवा विक्रम प्रस्थापित झाला. तब्बल ३,२२६ रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून समाजसेवेचा आदर्श घालून दिला. एवढ्या मोठ्या संख्येने झालेल्या रक्तदानामुळे असंख्य गरजू रुग्णांना जीवनदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, हा उपक्रम सेवा सप्ताहातील सर्वाधिक यशस्वी आणि लोकसहभागाचा ठरला.
याचबरोबर मतदारसंघातील ५६ धार्मिक स्थळांवर पूजा, वंदना आणि महाआरतीचे आयोजन करण्यात आले. समाजात शांतता, ऐक्य आणि सर्वधर्मसमभावाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमांना विविध धर्मीय नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी ५६ ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात आले. नागरिकांनी मोठ्या उत्साहाने वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षणाची सामूहिक जबाबदारी स्वीकारली.
सेवा सप्ताहातील सर्वाधिक महत्त्वाचा उपक्रम म्हणून आयोजित महाआरोग्य शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या शिबिरात सुमारे २ हजार रुग्णांनी विविध तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी व उपचारांचा लाभ घेतला. तपासणीदरम्यान ८३ रुग्ण गंभीर आजारांनी ग्रस्त असल्याचे निदर्शनास आले. त्यांच्यावर पुढील उपचारासाठी वर्धा जिल्ह्यातील सावंगी (मेघे) येथील रुग्णालयात मोफत शस्त्रक्रियांची व्यवस्था करण्यात आली. या शस्त्रक्रियांमध्ये कर्करोग, हिप रिप्लेसमेंट, मोतीबिंदू तसेच गर्भाशयाशी संबंधित आजारांवरील शस्त्रक्रियांचा प्रामुख्याने समावेश होता. आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना वेळेवर उपचार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत दिलासादायक ठरला.
याशिवाय सेवा सप्ताहादरम्यान विविध शासकीय योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे, सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम राबविणे, पर्यावरण संवर्धन, आरोग्य जनजागृती आणि समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. प्रत्येक उपक्रमाला नागरिक, सामाजिक संस्था, स्वयंसेवक तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.
यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा सप्ताह हा केवळ उत्सव नसून जनसेवेचा संकल्प असल्याचे सांगितले. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा, सामाजिक उपक्रम आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी आपण भविष्यातही अशाच लोकाभिमुख उपक्रमांचे सातत्याने आयोजन करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.



