ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कुडेसावलीत ‘स्वस्तिक वृक्ष लागवड पॅटर्न’चा शुभारंभ!

१६ प्रजातींच्या ८०० वृक्षांचे रोपण ; पर्यावरण संवर्धनासाठी ग्रामपंचायतीचा पुढाकार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपिपरी : _ विकसित भारत रोजगार व आजीविका हमी अभियान आणि जिल्हा खनिज निधी योजनांच्या संयुक्त अभिसरणातून गोंडपिपरी तालुक्यातील कुंडेसावली येथे ‘स्वस्तिक वृक्ष लागवड पॅटर्न’चा शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमांतर्गत १६ प्रजातींच्या ८०० वृक्षांचे रोपण करण्यात आले. ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेमुळे गावाच्या हरित विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. पर्यावरणाचा समतोल राखणे, जैवविविधतेचे संवर्धन करणे आणि हरित क्षेत्र वाढविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

‘स्वस्तिक वृक्ष लागवड पॅटर्न’चे संस्थापक ए. एस. नाथन यांच्या संकल्पनेनुसार राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमात विविध वृक्षप्रजातींच्या लागवडीसोबतच त्यांच्या संगोपनाला महत्त्व देण्यात आले आहे. वृक्षांच्या माध्यमातून पक्षी व कीटकांना अधिवास उपलब्ध होण्यास, मृदाक्षय रोखण्यास आणि भूजल पुनर्भरणाला हातभार लागण्यास मदत होणार आहे.

या कार्यक्रमाला विस्तार अधिकारी (पंचायत) जीवन प्रधान, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी नितेश दुर्योधन, तांत्रिक अधिकारी देवानंद चौधरी आणि ग्रामपंचायत अधिकारी जितेंद्र खोब्रागडे यांची उपस्थिती होती. गावातील महिला बचत गट, रोजगार सहाय्यक आणि मजूरवर्गानेही उपक्रमात सहभाग नोंदविला.

वृक्षलागवडीनंतर रोपांचे संरक्षण आणि नियमित संगोपन करणे आवश्यक आहे. यासाठी पाणीपुरवठा, वृक्षसंरक्षण आणि वेळोवेळी निरीक्षण करण्यावर भर देण्यात येणार असून, लागवड केलेली रोपे जगवून त्यांचे वृक्षांमध्ये रूपांतर करण्यासाठी ग्रामस्थांचे सहकार्य महत्त्वाचे ठरणार आहे, असे मत संवर्ग विकास अधिकारी संजय नैताम यांनी व्यक्त केले.

कुडेसावलीतील हा उपक्रम शासकीय योजनांचा समन्वय आणि लोकसहभाग यांच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाला चालना देणारा ठरणार आहे. नियोजनबद्ध वृक्षलागवड आणि दीर्घकालीन संगोपनातून गावाच्या हरित विकासाचा पाया अधिक भक्कम होण्यास मदत मिळणार आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये