जिल्हा नियोजनमधून दुष्काळ निवारणाची कामे प्राधान्याने पुर्ण करा – पालकमंत्री डॉ.पंकज भोयर
पालकमंत्र्यांकडून दुष्काळ उपाययोजनांचा आढावा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
पाणी व चारा टंचाईचे नियोजन करण्याच्या सूचना ; प्रत्येक गावात 200 जलतारा करण्याचे निर्देश
वर्धा :_ कमी पर्जन्यमानामुळे जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. येत्या काळात पिण्याच्या पाण्यासह जनावरांसाठी चारा, सिंचनासाठी पाणी आदी प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा तातडीच्या बाबींवर परिणाम होणार नाही, याकरीता जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून कामे करतांना दुष्काळ निवारणाच्या कामांना प्राधान्य द्या. कामांची मंजूरी प्रक्रिया आणि प्रत्यक्ष कामे तातडीने पुर्ण करा, असे निर्देश पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी यांनी दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी आ.राजेश बकाने, आ.सुमित वानखेडे, जिल्हाधिकारी वान्मथी सी, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, उपवनसंरक्षक हरविर सिंह, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय तेली, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड, निवासी उपजिल्हाधिकारी राजू रणवीर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांमध्ये पिककर्ज पुनर्गठन करण्यासोबतच पिककर्जाच्या वसूलीस स्थगिती दिली आहे. विद्यार्थ्यांची शालेय फी माफ करण्यात आली आहे. संबंधित विभागांनी शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे उपाययोजना करणे गरजेचे आहे, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.
दुष्काळी स्थितीत पिण्याच्या पाण्याला प्रथम प्राधान्य आहे. जिल्ह्यातील विविध प्रकल्पांमध्ये उपलब्ध पाणीसाठ्याचा आढावा घेऊन पाण्याचे नियोजन करावे. आवश्यक्ता भासल्यास पाणी कपातीचा निर्णय प्रशासनाने घ्यावा. ज्या प्रकल्पांमध्ये पुरेसा साठा उपलब्ध आहे. अशा ठिकाणी पिकांना दोन पाणी पाळ्या देण्याबाबत नियोजन करावे. जिल्ह्यात जनावरांसाठी चारा टंचाई जाणवण्याची शक्यता पाहता पशुसंवर्धन, कृषी, महसूल व जलसंपदा विभागाने गाळपेर किंवा अन्य ठिकाणी लवकर तयार होणाऱ्या चाऱ्यांची लागवड करावी, असे ते म्हणाले.
काही शेतकरी आपल्या जमीनींवर चाऱ्याची लागवड करण्यास तयार आहे. परंतू त्यांना चारा खरेदीची हमी पाहिजे, अशी बाब पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर यासंबंधीत प्रस्ताव तयार करून शासनास सादर करण्यात यावा. पुढील जुलै अखेरपर्यंत चारा टंचाई जाणवणार नाही तसेच शेतकऱ्यांना चारा आधारीत पिके घेण्यासाठी प्रवृत्त करावे. यासाठी आवश्यक बियाण्याचे वाटप करावे. चारा डेपोची ठिकाणे निश्चित करण्यासोबतच जिल्ह्यातील चारा इतर जिल्ह्यात जाणार नाही यासाठी दक्ष राहण्याच्या सूचना केल्या.
यावेळी पालकमंत्र्यांनी उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, मुख्याधिकारी यांच्याकडून तालुकानिहाय पाणी, चारा, सिंचन तसेच एकूनच दुष्काळ व टंचाई निवारणाचा आढावा घेतला. गावे व शहरांना पाणी पुरवठा करणाऱ्या प्रकल्पांमधील सद्यस्थिती जाणून घेतली. टंचाई निवारणासाठी अधिग्रहनासाठी संभाव्य विहिरींची यादी, वनक्षेत्रातील चारा शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणे, मोठ्या ग्रामपंचायतींच्या ठिकाणी पाणी वितरणाचे सुक्ष्म नियोजन करणे, आदींचा आढावा घेतला.
*नाचनगाव, वायगावचा पाणी प्रश्न सोडवा : आ.राजेश बकाने*
देवळी विधानसभा मतदारसंघातील नाचनगाव आणि वायगाव येथे पाणी प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. येथील योजना पुर्ण करून पाणी प्रश्न सोडविणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना सिंचनासाठी किमान दोन पाणी पाळ्या मिळणे आवश्यक आहे. तसे नियोजन करण्यासोबतच शेतकऱ्यांना पाणी सोडण्यापुर्ण सूचना देण्यात यावी, असे आ.बकाने यांनी यावेळी सांगितले. मतदारसंघातील शहरे व गावांच्या संभाव्य टंचाईचा विषय उपस्थित केला.
*आतापासूनच चारा टंचाईचे नियोजन आवश्यक : आ.सुमित वानखेडे*
पाण्याअभावी यावर्षी चारा टंचाईची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. पशुसंवर्धन विभागाने आतापासूनच चारा टंचाई निवारणाचे नियोजन करणे आवश्यक आहे. संभाव्य टंचाईपेक्षा अधिक चारा उत्पादनाचे नियोजन करावे. आष्टी, कारंजा येथील पाणी पुरवठा योजना तसेच मतदारसंघातील तिनही शहरांना होणाऱ्या पाणी पुरवठ्याची माहिती घेतली. कुठेही पाणी, चारा टंचाई जाणवणार नाही, याचे नियोजन करण्याच्या सूचना केल्या.
जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी जिल्ह्याची टंचाई स्थिती व प्रशासनाच्यावतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली. पिण्याच्या पाण्यासह वन्यप्राण्यासाठी पाणी, व्हीबीजीरामजी योजनेतून घेण्यात येणारी कामे, टिल्लू पंपांवर कारवाई, जलजीवनची अपुर्ण कामे पुर्ण करण्यासाठी आवश्यक निधी याबाबत माहिती दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांनी जिल्हा परिषदेच्यावतीने प्रत्येक गावात जलतारा उपक्रमांतर्गत पाणी मुरविण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला असल्याचे सांगितले.



