भद्रावती खरेदी-विक्री संस्थेवर ‘भगवा’ कायम
दादाजी भट अध्यक्ष तर ॲड. निलेश पिंगे उपाध्यक्षपदी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
सहकार क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाची संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भद्रावती येथील सहकारी शेतकी खरेदी-विक्री सहकारी संस्थेवर पुन्हा एकदा ‘भगवा’ फडकला आहे. सन २०२५-२६ ते २०२९-३० या आगामी पाच वर्षांच्या कालावधीसाठी पार पडलेल्या निवडणूक प्रक्रियेत सर्व १३ संचालकांची बिनविरोध निवड झाल्याने संस्थेतील सत्ता अबाधित राहिली आहे. या निवडीनंतर पार पडलेल्या विशेष सभेत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया खेळीमेळीच्या वातावरणात पूर्ण झाली.
यामध्ये अध्यक्षपदी दादाजी लटारी भट यांची, तर उपाध्यक्षपदी ॲड. निलेश वामनराव पिंगे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली असून, उपस्थित सर्व संचालकांनी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. विशेष म्हणजे, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे यांनी बँकेची धुरा सांभाळल्यापासून जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रामध्ये भारतीय जनता पक्षाचा वरचष्मा मोठ्या प्रमाणावर निर्माण झाला आहे. शिंदे यांच्या खंबीर नेतृत्वामुळेच आज ठिकठिकाणी सहकार क्षेत्रातील दिग्गज नेते भाजपमध्ये दाखल होत असून, या संस्थेतील बिनविरोध सत्ता मिळवण्यात त्यांच्या नेतृत्वाचा मोठा वाटा राहिला आहे.
ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया आणि संस्थेची बिनविरोध वाटचाल माजी गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, जिल्ह्याचे नेते माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार, चिमूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बंटीभाऊ उर्फ कीर्तीकुमार भांगडीया, आमदार किशोर जोरगेवार, राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे व वरोरा विधानसभा क्षेत्राचे आमदार करण देवतळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
नवनिर्वाचित संचालक मंडळामध्ये लक्ष्मण खाडे, संतोष काळे, पुरुषोत्तम कोंगरे, विलास घोटकर, जनार्धन नन्नावरे, युवराज निबुधे, आण्याजी लांबट, श्रीकांत डोंगे, पंढरी खंगार, श्रीमती गोपीका सुर आणि रत्नमाला आस्कार यांचा समावेश असून, या सर्वांनी एकजुटीने संस्थेच्या विकासाचा संकल्प सोडला आहे. या यशस्वी प्रक्रियेसाठी श्री साई नागरी सहकारी संस्था चंद्रपूरचे अध्यक्ष प्रवीण सुर, भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजू डोंगे, सभापती डॉ. विजय देवतळे, तसेच चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तथा उपसभापती जयंत टेमुर्डे, उपसभापती अश्लेषा भोयर (जिवतोडे) आणि संचालक गजानन उताणे यांनी विशेष परिश्रम घेतले. संस्थेच्या या एकमुखी निर्णयामुळे आणि बिनविरोध निवडीमुळे सहकार वर्तुळात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व संचालकांचे सर्व स्तरांतून अभिनंदन केले जात आहे. आगामी काळात ही संस्था शेतकऱ्यांच्या हितासाठी नव्या जोमाने कार्य करेल, असा विश्वास यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.



