मानधन थकला,आम्ही कुटुंब पोसायचे कसे?
आशा व गट प्रवर्तक धडकल्या जिल्हा परिषद कार्यालयावर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
केंद्र सरकार कडून आशा व गट प्रवर्तक कर्मचारी यांना मिळणारा मानधन ऑक्टोबर २०२५ पासून थकित असून तो तातडीने देण्यात यावा. आशा व गट प्रवर्तक यांना शासकीय कर्मचारी दर्जा द्या तसेच गट प्रवर्तक यांना कंत्राटी कर्मचारी म्हणून मान्यता देण्याचा प्रस्ताव त्वरित मंजूर करावा, सेवानिवृत्ती वयोमर्यादा ६० वरून ६५ करण्यात यावी यासह विविध मागण्यासाठी आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गट प्रवर्तक कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष कॉ. विनोद झोडगे पाटील यांच्या नेतृत्वात ६ महिन्याचा मानधन थकला असल्याने आम्ही जगायचे कसे असा संतप्त सवाल करत जिल्हा परिषद कार्यालय चंद्रपूर वर धडक देत सरकार विरोधात तीव्र घोषणाबाजी करून मुख्यकार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या माध्यमातून केंद्र सरकार व राज्य सरकार कडे निवेदन देण्यात आले. थकित मानधन त्वरित न मिळाल्यासं दिनांक २१ एप्रिल रोजी मुंबई आझाद मैदानावर राज्यव्यापी तीव्र आंदोलन आणि बेमुदत संप करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
निवेदनात म्हटलं आहे की आशा स्वयंसेविकावर विविध ऑनलाइन कामाचा वाढता ताण टाकला जात आहे. लाभार्थीच्या विविध याद्या , आधार अपडेट, ७० वर्षा वरील लाभार्थी यादी, वंध्यत्व कार्ड यासारखी माहिती सातत्याने ऑनलाईन मागितली जात आहे. मात्र बहुतेक आशाकडे साधे मोबाईल फोन असल्यामुळे त्यांना मानसिक ताण सहन करावा लागत असुन जो पर्यंत शासनाकडून अत्याधुनिक अँड्रॉइड मोबाईल, सिमकार्ड व पुरेसा डेटा पॅक दिला जात नाही तो पर्यंत मात्र ऍपवरील ऑनलाइन कामाची सक्ती करू नये तसेच ६० वर्ष पूर्ण झालेल्या आशाना सेवानिवृत्त करण्याचे आदेश दिले असलेतरी सेवानिवृत्ती नंतर त्यांच्या उपजिविकेचे प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे आशा व गट प्रवर्तक यांना दरमहा पाचहजार रुपये निर्वाह भत्ता द्यावा किंवा सेवानिवृत्तीचे वय ६५ करण्यात यावे. प्रधानमंत्री मातृ वंदन योजनेचा मागील अनेक वर्षाचा थकित मोबदला द्या. प्रसूती रजा व आजारपणाची भरपगारी रजा मंजूर करा. विना मोबदला कामे सांगणे बंद करा. GPS कॅमेरा मोबाईल द्वारे फोटो काढण्याची सक्ती बंद करा यासह अन्य मागण्या करण्यात आल्या आहे.
या आंदोलनाचे नेतृत्व आयटक चे राज्य सचिव कॉ. विनोद झोडगे पाटील, जिल्हा सचिव कॉ. निकिता नीर. आशा संघटना अध्यक्ष कॉ. सुहासिनी वाकडे, कॉ. ममता भीमटे गट प्रवर्तक संघटना, कॉ. सविता गठलेवार चंद्रपूर शहर सचिव, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉ रवींद्र उमाटे, कॉ.राजू गैनवार माजी नगरसेवक व जिल्हा कार्याध्यक्ष आयटक, कॉ. प्रा. नामदेव कन्नाके, वर्षा घुमे, शारदा मानापुरे, मिना चौधरी, फरजना शेख, नलिनी थेरकर, सीमा शेंडे, पौर्णिमा सूर्यवंशी, आशा धांडे, सुनीता वनकर, जयवंता रामटेके, सुजाता रंगारी, ज्योत्स्ना ठोंबरे, सुरेखा तेलंग, विद्या बाबनवाडे, चैताली अर्नसपुरे, अस्मिता गोडसेल यांनी केले. यावेळी जिल्हाभरातील हजारो आशा व गट प्रवर्तक कर्मचारी उपस्थित होते.



