ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

तहसीलदाराविरोधात ११० कोटींच्या महसूल नुकसानीचा आरोप

जिल्हाधिकारी कडे चौकशी व निलंबनाची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

   भद्रावती येथील तहसीलदार राजेश भांडारकर यांच्या विरोधात गौण खनिजांच्या अवैध उत्खननास संरक्षण, भ्रष्टाचार व पदाचा दुरुपयोग केल्याचा गंभीर आरोप करत त्यांच्या विरुद्ध स्वतंत्र चौकशी व तात्काळ निलंबनाची मागणी करण्यात आली आहे. याबाबत माजरी कॉलरी, शिवजी नगर निवासी विरेंद्र उर्फ बबलू राय यांनी चन्दनखेडा येथील छञपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियाना दरम्यान जिल्हाधिकारी वसुमना पंत यांचे कडे निवेदन सादर केले.

       निवेदनानुसार, तहसीलदार भांडारकर यांच्या कार्यकाळात रेती, मुरूम व माती यांचे मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन व वाहतूक सुरू असून, यामुळे शासनाच्या महसुलाचे ₹११० कोटींपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच नागरिक व शेतकऱ्यांची प्रकरणे जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवून त्याकडे दुर्लक्ष केल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

नंदोरी परिसरातील माती चोरी प्रकरणात हजारो ब्रास मातीची बेकायदेशीर वाहतूक झाल्याचे समोर आले असून, संबंधित तक्रारींकडे सुरुवातीला दुर्लक्ष करण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे. याशिवाय देऊरवाडा, तिरवंजा आदी भागांतही मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

वीटभट्टी व्यावसायिकांकडून आर्थिक लाभ घेऊन त्यांच्या बेकायदेशीर कारभाराकडे दुर्लक्ष केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या सर्व प्रकारांमुळे शासनाचा महसूल मोठ्या प्रमाणात बुडाल्याचे निवेदनात नमूद आहे.

सदर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून तहसीलदार भांडारकर यांना तात्काळ निलंबित करावे तसेच त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये