गुड फ्रायडे सुट्टीच्या दिवशी मुरूम उत्खनन परवान्याचा ‘शुभमुहूर्त’..!

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
एकीकडे अवैध उत्खननाविरोधात कडक कारवाईचे दावे केले जात असताना, दुसरीकडे महसूल विभागाच्या संशयास्पद कारभारामुळे ‘मुरूम माफिया’ आणि प्रशासनाचे साटेलोटे तर नाही ना? असा खळबळजनक प्रश्न आता उपस्थित होत आहे. वढोली येथील सर्वे क्रमांक १९१ मधून मुरूम उत्खनन करण्यासाठी दिलेली परवानगी सध्या संपूर्ण तालुक्यात चर्चेचा आणि वादाचा विषय ठरली आहे.
विशेष म्हणजे, काल (दिनांक ३ मार्च) ‘गुड फ्रायडे’ निमित्त शासकीय सुट्टी असतानाच या उत्खनन परवान्याची अंमलबजावणी सुरू झाल्याचे दिसत आहे. सलग तीन दिवस शासकीय सुट्ट्या असल्याने महसूल विभागाचे कोणतेही नियंत्रण किंवा मोजमाप असणार नाही. याच संधीचा फायदा घेत रॉयल्टीच्या नावाखाली हजारो ब्रास मुरूम बेसुमारपणे ओरबाडला जाण्याची भीती व्यक्त होत आहे. सुट्टीच्या दिवसापासूनच परवाना सुरू होण्यामागे प्रशासनाचा नेमका हेतू काय, की हा ‘माफिया’धार्जिणा निर्णय आहे? अशा चर्चांना उधाण आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वढोली येथील सर्वे क्रमांक १९१ मधून इंद्रपाल धुडसे यांच्या नावाने ही परवानगी काढण्यात आली आहे. धुडसे हे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती असल्याने, त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून महसूल अधिकाऱ्यांवर दबाव टाकला आणि जाणीवपूर्वक सुट्टीच्या काळात ही परवानगी मिळवली असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. सामान्य माणसाला साध्या कामासाठी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतात, मात्र ‘बड्या’ लोकांसाठी सुट्टीच्या दिवशीही प्रशासनाचे दरवाजे उघडे असतात का? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
*”रॉयल्टी केवळ नावाला आणि उत्खनन मात्र अफाट, असा हा प्रकार असून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवण्याचा हा घाट घातला जात आहे.”*
*वृत्तपत्रांमधून सातत्याने मुरूम माफियांच्या मनमानीच्या बातम्या येत असतानाही महसूल विभाग कुंभकर्णी झोपेत का आहे?*
*सुट्टीच्या काळात होणाऱ्या या उत्खननावर लक्ष ठेवण्यासाठी कोणतेही भरारी पथक तैनात नसल्याने ‘आओ जावो घर तुम्हारा’ अशी स्थिती निर्माण झाली आहे.*



