ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

धुंडिराज मठ, देऊळगाव राजा येथे येथे सकल हिंदू संमेलन संपन्न 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

श्रीकृष्ण वस्ती द्वारे आयोजित ‘सकल हिंदू समाज संमेलन’ रविवार, २९ मार्च २०२६ रोजी स्थानिक प.पू.धुंडीराज मठ च्या प्रांगणात अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात पार पडले. हिंदू समाजाचे संघटन आणि सांस्कृतिक जागृती या उद्देशाने आयोजित या संमेलनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाची सुरुवात अतिशय नयनरम्य दृश्याने झाली. श्रीकृष्ण आणि विठ्ठल भगवान यांच्या वेशभूषेतील दोन लहान मुलांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या चिमुकल्यांच्या रूपात साक्षात भगवंत अवतरल्याची भावना उपस्थितांमध्ये निर्माण झाली होती.

कार्यक्रमात सुखानंद भजनी मंडळाने प्रभू श्रीराम यांच्या जीवन चरित्रावर आधारित भजने सादर केली. भजनांच्या सुरावटींनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. प्रभू श्रीरामांच्या गुणगानाने वातावरणात चैतन्य निर्माण झाले आणि उपस्थित भाविक भक्तीत तल्लीन झाले होते

भारतीय संस्कृती आणि संस्कारांचे जतन काळाची गरज;असून महिलांनी पुढाकार घेण्याचे आवाहन – अश्विनी धन्नावत यांनी केले.

“आपली भारतीय संस्कृती आणि कौटुंबिक संस्कार ही आपली खरी श्रीमंती आहे. आज जग आपल्या संस्कृतीचा स्वीकार करत असताना, आपण आपल्या मूल्यांचे जतन करणे आणि ती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे ही काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्त्यांनी केले.

श्रीकृष्ण वस्ती देऊळगाव राजा येथील सकल हिंदू समाज द्वारे आयोजित हिंदू संमेलन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. याप्रसंगी गोपाळजी पितळे, विवेकजी विडवई, अश्विनी धन्नावत, घनशाम भंडारे यांच्यासह परिसरातील मान्यवर आणि मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

अश्विनीताई आपल्या भाषणात बोलताना महिलांच्या शिस्तीचे आणि भक्तीचे कौतुक केले. त्या म्हणाल्या की, “मंदिरात पूजेच्या वेळी महिलांची गर्दी आणि त्यांची श्रद्धा वाखाणण्याजोगी असते. ज्या शिस्तीने आपण देवाची पूजा करतो, दूध-पाणी अर्पण करण्याचे जे नियम पाळतो, तशीच शिस्त आपल्याला आपले घर, मुले आणि समाजाला घडवण्यासाठी अंगीकारायची आहे. बोलताना शेवटी आपण आपल्या संस्कृतीचे जतन करणारी शेवटची पिढी ठरू नये, तर ही मूल्ये आपल्या मुला-मुलींमध्ये रुजवून ती पुढे नेण्याची जबाबदारी महिलांची असल्याचे आवाहन त्यांनी केले.”

जगाला आश्रय देणारी भारतीय संस्कृती असून ज्ञान आणि धर्माच्या रक्षणातूनच भारताची सर्वांगीण प्रगती होते

‘स्वबोध जागरण आणि समाज परिवर्तनातूनच भारताचे परम वैभव’ – प्राप्त होते असे विवेक बिडवई यांनी सांगितले

भारतीय संस्कृती ही सर्वसमावेशक आहे. याचे उदाहरण देताना बिडवाई यांनी ज्यू (Jews) आणि पारशी समाजाचा उल्लेख केला. जगाच्या पाठीवर ज्या ज्या वेळी या समाजांवर अन्याय झाला, त्यांना केवळ भारतातच सन्मानाने आणि आपला धर्म पाळत राहता आले. इस्रायल आणि इराणच्या (पर्शिया) इतिहासाचा दाखला देत, भारतीय संस्कृतीने हजारो वर्षांच्या आक्रमणांनंतरही आपले अस्तित्व टिकवून ठेवले असल्याचे त्यांनी सांगितले.

देशाला ‘परम वैभवा’च्या शिखरावर नेण्यासाठी धर्माचे संरक्षण आणि ज्ञानाची उपासना हाच मार्ग असल्याचे या भाषणातून स्पष्ट करण्यात आले. संघाच्या माध्यमातून आज देशात २ लाख पेक्षा जास्त सेवा प्रकल्प राबवले जात आहेत. यात शाळा, आरोग्य सेवा, संस्कार वर्ग आणि विविध लोकोपयोगी उपक्रमांचा समावेश आहे. मात्र, या सर्वांपेक्षा महत्त्वाचे काम म्हणजे हिंदू समाजात निर्माण केलेला स्वाभिमान आणि ‘आत्मभान’ होय. १९२५ साली असलेली स्थिती आणि आजची स्थिती यात मोठा बदल झाला असून, आज हिंदू समाज अभिमानाने आपली ओळख सांगत आहे, असे वक्त्याने नमूद केले. भाषणात ‘भारत’ या शब्दाची अत्यंत मार्मिक व्याख्या करण्यात आली. ‘भा’ म्हणजे ज्ञान किंवा प्रकाश आणि जो ‘ज्ञानात रत’ (मग्न) आहे, तो देश म्हणजे भारत.” हिंदू धर्म हा इतर धर्मांप्रमाणे कोणत्याही एका व्यक्तीने स्थापन केलेला नसून, तो सृष्टीच्या जन्मापासून असलेला ‘सनातन’ धर्म आहे, असेही सांगण्यात आले. वक्त्याने पालकांना आवाहन केले की, मुलांवर केवळ पाश्चिमात्य संस्कृतीचे संस्कार न होता, त्यांना प्रभू राम, श्रीकृष्ण आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा खरा इतिहास माहिती असावा. कुटुंबात दिवसातून किमान एकदा तरी सर्वांनी एकत्र बसून भोजन करावे आणि मुलांशी संवाद साधावा, जेणेकरून त्यांच्यावर योग्य संस्कार होतील.

“हिंदवः सोदरा सर्वे” या मंत्राचा उच्चार करत, समाजात जातीभेदाला थारा नसावा, असे ठामपणे सांगण्यात आले. मंदिरे आणि स्मशानभूमी सर्वांसाठी खुल्या असणे ही काळाची गरज आहे. तसेच, निसर्गपूजक भारतीय संस्कृतीचा वारसा जपत पाणी वाचवणे, प्लास्टिकचा वापर टाळणे आणि वृक्षारोपण करणे हे प्रत्येक हिंदूचे कर्तव्य असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. भारताला विश्वगुरू बनवण्यासाठी केवळ घोषणा देऊन चालणार नाही, तर नियमांचे पालन करणारा शिस्तप्रिय समाज हवा. सर्वसमावेशक वृत्ती पुन्हा जागृत करण्याची गरज आहे. शतकोत्तर प्रवासाकडे कूच करताना, ‘स्व’चे जागरण आणि राष्ट्राप्रती निष्ठा हेच भारताला परम वैभवाकडे नेणारे मार्ग ठरतील, असा विश्वास या भाषणातून व्यक्त करण्यात आला.

ह.भ.प. गोपाल पितळे यांनी सांगितले की

“राष्ट्राचे रक्षण आणि धर्माचा अभिमान बाळगण्यासाठी केवळ शारीरिक शक्ती पुरेशी नाही, तर त्यासोबत भक्ती आणि संघटनाची ताकद असणे आवश्यक आहे,” असे प्रतिपादन करण्यात आले. या भाषणातून हिंदू समाजाला जागृत राहण्याचे आणि संघटित होण्याचे आवाहन करण्यात आले.ह्यावेळी बोलत असताना छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्यांच्या उदाहरणांचा दाखला देण्यात आला. “ज्याप्रमाणे मूठभर मावळ्यांनी एकत्र येऊन बलाढ्य शत्रूंना नमवले, त्याचप्रमाणे आजच्या काळातही हिंदू समाजाने आपसातील मतभेद विसरून एकवटणे गरजेचे आहे,” असे वक्त्याने नमूद केले.

संघटनामध्ये मोठी शक्ती असते आणि संघटित समाजच राष्ट्रापुढील संकटांचा सामना करू शकतो, यावर त्यांनी भर दिला. आजच्या तरुण पिढीने आपल्या गौरवशाली इतिहासाचा विसर पडू देऊ नये, असे आवाहन करत वक्त्याने सांगितले की, व्यसनांपासून दूर राहून तरुणांनी आपली शारीरिक आणि बौद्धिक क्षमता राष्ट्रकार्यासाठी खर्च करावी. केवळ सण-उत्सव साजरे करणे म्हणजे धर्मरक्षण नव्हे, तर धर्माच्या मूल्यांचे आचरण करणे ही खरी भक्ती आहे. भारत हा केवळ भूभाग नसून ती एक जिवंत विचारधारा आहे. जगाला शांती आणि ज्ञानाचा संदेश देणारी ही भूमी असून, तिचे रक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाचे आद्य कर्तव्य असल्याचे सांगण्यात आले. समाजातील जातीभेद आणि विषमता नष्ट करून समरसता निर्माण करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. “जेव्हा आपण ‘मी’ सोडून ‘आम्ही’ म्हणू, तेव्हाच खऱ्या अर्थाने समाज परिवर्तन होईल,” असेही पितळे महाराजांनी स्पष्ट केले. या संमेलनामध्ये हिंदू धर्माचे रक्षण, कौटुंबिक संस्कार, सामाजिक समरसता आणि राष्ट्रभक्ती या विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

समाजातील प्रत्येक घटकाने संघटित होऊन राष्ट्राच्या प्रगतीसाठी योगदान देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरज गुप्ता यांनी केले, तर उपस्थित मान्यवर आणि भाविकांचे आभार प्रदर्शन प्रकाश अहिरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीकृष्ण वस्तीतील कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सुरुवात गोमाता पूजनाने झाली त्यानंतर मान्यवरांनी छत्रपती श्री. शिवाजी महाराज व भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन केले. कार्यक्रमाच्या शेवटी भारतमातेची आरती व नंतर उपस्थित सर्वांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडलेल्या या संमेलनाने हिंदू समाजातील एकजूट आणि सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडवले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये