सोनुर्ली येथील शिक्षिका सलमा कुरेशी राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
शिक्षण क्षेत्रातील समर्पित कार्य, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तळमळ आणि नाविन्यपूर्ण अध्यापन पध्दती यांचा गौरव करीत महात्मा गांधी विद्यालय, सोनुर्ली येथील उपक्रमशील शिक्षिका सलमा शेख सत्तार कुरेशी यांना 2025_26 या शैक्षणिक वर्षातील प्रतिष्ठेचा महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर संचालित महात्मा गांधी विद्यालय सोनुर्ली येथील सलमा कुरेशी यांच्या या यशामुळे जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात अभिमानाची भर पडली आहे.
ध्येय एज्युकेशन फाऊंडेशन महाराष्ट्र तर्फे पुणे येथील ग दि मांडगूळकर नाट्यगृहात आयोजित केलेल्या एज्युकेशन आयकॉन समिट 2026 या भव्य सोहळ्यात हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. कार्यक्रमाला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर सौ शर्मिला बाबर, छत्रपती संभाजी नगरचे उप जिल्हाधिकारी शुभम पवार, पुणे जिल्हा परिषद चे शिक्षणाधिकारी डॉ भाऊसाहेब कारेकर, तसेच शिक्षण मंडळ सभापती नानासाहेब शिवले यांची प्रमुख उपस्थिती लाभली. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे व राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त दत्तात्रय वारे गुरूजी यांच्या हस्ते सलमा कुरेशी यांना सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र, शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले, यावेळी उपस्थित शिक्षण तज्ज्ञांनी टाळ्यांच्या गजरात त्यांच्या कार्याचा सन्मान केला. संपूर्ण महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यामधून अत्यंत काटेकोर व पारदर्शक निवड प्रक्रियेद्वारे या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
सलमा कुरेशी यांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे,सचिव धनंजय गोरे, सर्व संचालक, मुख्याध्यापक बबन भोयर, तथा सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.



