तेलंगणात आध्यात्मिक मेळावा रंगला ; प. पू. सद्गुरू दादाश्री महाराजांच्या महासत्संगास मोठा प्रतिसाद
सूक्ष्मध्यान साधना शिबीरासह हजारो भाविकांची उत्स्फूर्त उपस्थिती ; भक्तिमय वातावरणात आध्यात्मिक संगम
चांदा ब्लास्ट
चंद्रपूर :_ मुक्तेश्वरी गुरुपीठाचे प. पू. सद्गुरू दादाश्री महाराज यांच्या परम पावन सानिध्यात आयोजित सूक्ष्मध्यान साधना शिबीर व महासत्संग कार्यक्रम रविवार, दि. २९ मार्च २०२६ रोजी तेलंगणा विभागातील कवडाला येथील कन्यका परमेश्वरी सभागृहात अत्यंत उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या आध्यात्मिक मेळाव्यास तेलंगणा व परिसरातील हजारो भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सत्संगाचा लाभ घेतला.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी सूक्ष्मध्यान साधनेने झाली. सकाळी ९ ते ११ या वेळेत पार पडलेल्या ध्यान सत्रामध्ये साधकांनी शांत व एकाग्र वातावरणात ध्यानधारणा करत आत्मिक शांतीचा अनुभव घेतला. सूक्ष्मध्यान साधनेदरम्यान सभागृहात सकारात्मक व आध्यात्मिक ऊर्जा निर्माण झाल्याची भावना उपस्थित साधकांनी व्यक्त केली.
यानंतर सकाळी ११.३० ते दुपारी २ वाजेदरम्यान महासत्संगाचे आयोजन करण्यात आले. यावेळी प. पू. सद्गुरू दादाश्री महाराजांनी अध्यात्माचे महत्त्व, नियमित साधनेची गरज, मनःशांतीसाठी ध्यानाचे स्थान तसेच सकारात्मक जीवनमूल्यांचा अंगीकार यावर सखोल मार्गदर्शन केले. त्यांच्या प्रेरणादायी विचारांनी उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले.
महासत्संगानंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध नियोजन व भक्तिमय वातावरणात पार पडला. कार्यक्रमानंतर उपस्थित साधकांनी आध्यात्मिक ऊर्जा, मानसिक समाधान व अंतर्मनातील शांततेची अनुभूती मिळाल्याची भावना व्यक्त केली.



