अधिकारी कार्यवाहीत व्यस्त! तर कर्मचारी माया जमवण्यात व्यस्त
खडकपूर्णा धरण परिसरात रेतीच्या अवैध उपशाला ऊत; तस्कर मुजोर!

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
महसूल विभागाकडून कारवाई करण्यात येत असतानाही रेती तस्करांकडून दिले जातेय आव्हान
देऊळगाव राजा तालुक्यातील नव्हे तर जिल्ह्यातील सर्वात मोठ्या खडकपूर्णा धरण व नदीपात्रातून रेतीचा अवैध उपसा आणि वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू असून, महसूल विभागाकडून सातत्याने कारवाई होत असली तरी रेती माफियांवर याचा काहीच परिणाम होत नसल्याचे चित्र आहे. कार्यवाहीसाठी गेलेल्या अधिकारी पथकाला रिकाम्या हाताने परतावे लागत असल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. परंतु कार्यवाहीसाठी निघालेल्या अधिकाऱ्यांचे लोकेशन ग्राम पातळीवर कार्यरत असलेले महसूल कर्मचारी रेती तस्करांना देत असल्यामुळे त्यात सावध होऊन रेती तस्कर ग्राम पातळीवर कार्यरत कर्मचाऱ्यांचा अर्थपूर्ण बडदास्त राखत असल्यामुळे अधिकारी सुद्धा हतबल झाल्याचे चित्र सध्या तालुक्यात पाहावयास मिळत आहे.
: ऋतू कोणताही असो खडकपूर्णा नदीपात्र व धरणालगतच्या भागातून रेतीचा अवैध उपसा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. महसूल विभागाने यावर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष पथकांची स्थापना केली आहे; मात्र, या पथकांच्या हालचालींची माहिती तस्करांपर्यंत अगोदरच पोहोचत असल्याने कारवाईच होत नाही. महसूल विभागाकडून टिप्पर पकडणे, दंडात्मक कारवाई करणे, बोटी नष्ट करणे यांसारख्या उपाययोजना केल्या जात आहेत; परंतु विभागातील काही कर्मचाऱ्यांकडूनच वरिष्ठांच्या हालचालींची माहिती तस्करांपर्यंत पोहोचविली जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे महसूल कर्मचाऱ्यांची तस्करांशी आर्थिक संगनमताची चर्चा खुलेआम होताना दिसत आहे. त्यांचे सीडीआर काढून कारवाईची मागणी होत आहे.
खडकपूर्णा नदीतून बोटीद्वारे अवैधरित्या होत असलेला रेती उपसा. थांबविण्यासाठी अधिकारी वर्ग धडपड करत असला तरी त्यांची मेहनत व्यर्थ जात आहे. सोबतच्याच महसूल कर्मचाऱ्याकडून अधिकाऱ्यांचे लोकेशन दिल्या जात असल्यामुळे हे सुद्धा अधिकाऱ्यांना माहित असते तरीसुद्धा त्यांच्यावर कार्यवाही होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.
*वर्षानुवर्ष महसूल कर्मचाऱ्यांचे तालुक्यातच बस्तान*
ग्राम पातळीवर मंडळ अधिकारी तसेच तलाठी( महसूल कर्मचारी ) यांची तालुक्याच्या बाहेर बदली होताना दिसत नाही दहा ते पंधरा वर्षे एकाच तालुक्यात या कर्मचाऱ्यांचा मुक्काम असल्यामुळे तालुक्याची भौगोलिक सह लोकप्रतिनिधींची जाणीव या कर्मचाऱ्यांना असते. शासकीय नियमानुसार बदलीचा काही कालावधी ठरलेला आहे परंतु ते या ठिकाणी वर्षानुवर्षे कसे राहतात हे अजूनही सर्वसामान्यांना न उलगडलेले कोडे आहे. *मालक लपतो, चालकांवर दंडात्मक कारवाई*
अवैध वाहतूक करणाऱ्या टिप्परवर कारवाई करण्यात येते, परंतु कारवाई केवळ चालकांच्या नावाने केली जाते. अशा वाहनांच्या मूळ मालकांवर पोलिस कारवाई होणे आवश्यक आहे. त्यांची नावे तहसील कार्यालयाच्या सूचना फलकावर लावल्यास त्यांच्यावर सामाजिक दबाव निर्माण होईल. असे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.
*कारवाई होत असूनही तस्कर बिनधास्त*!
महसूल विभागाकडून फक्त दंडात्मक कारवाई केली जाते. तस्कर सहज दंड भरतात आणि लगेचच पुन्हा रेतीचा अवैध उपसा सुरू करतात. कारण त्यांची कमाई इतकी मोठी आहे की दंड त्यांच्या दृष्टीने किरकोळ ठरतो. तस्कर रेती उपशासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी वापरत असून, त्यासाठी काहीजण मोबदला घेत असल्याची माहिती आहे. त्यामुळे महसूल विभागाने अशा जमिनींची यादी करून त्यांच्यावर कारवाई करावी, तसेच अशा जमिनींच्या सातबाऱ्यावर बोजा चढवावा, अशी मागणी होत आहे. अशी मागणी विविध संघटना करीत आहेत.
खडकपूर्णा नदीपात्रातून होत असलेला रेतीचा अवैध उपसा पर्यावरणाला घातक ठरत आहे. महसूल विभागाने दंडात्मक कारवाईसोबतच पोलिस कारवाई केल्यास याला बऱ्यापैकी आळा बसू शकतो. त्यासाठी महसूल, पोलिस व उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून संयुक्त कारवाई करावी.
गिरीश वाघमारे – सामाजिक कार्यकर्ते



