लोहारडोंगरी खाण प्रकल्पाबाबत केंद्र सरकारने दखल घेण्याची खासदार डॉ. नामदेव किरसान यांची संसदेत मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
ब्रम्हपुरी : चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील लोहारडोंगरी येथे प्रस्तावित असलेल्या लोहखनिज (Iron Ore) खाण प्रकल्पाच्या अनुषंगाने, गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी लोकसभेत मुद्दा उपस्थित केला. या प्रकल्पाचे गांभीर्य लक्षात घेता केंद्र सरकारने यात तातडीने दखल द्यावी आणि पर्यावरण संरक्षणासाठी आवश्यक पावले उचलावीत, अशी विनंती त्यांनी केली.
खासदार किरसान यांनी संसदेत नमूद केले की, लोहारडोंगरी येथील प्रस्तावित खाणकामासाठी सुमारे ३५३ हेक्टर वनजमीन आणि त्यातील १८,००० वृक्षांची होणारी संभाव्य कत्तल ही चिंतेची बाब आहे. हा संपूर्ण परिसर ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि घोडाझरी वन्यजीव अभयारण्याला जोडणारा महत्त्वाचा ‘वाइल्डलाईफ कॉरिडॉर’ आहे. त्यामुळे, या प्रकल्पाचा वन्यजीव अधिवासावर काय परिणाम होईल, याचा सखोल विचार होणे गरजेचे आहे.
हा प्रकल्प पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत घातक असून स्थानिक लोकांचा याला मोठा विरोध आहे “राज्य वन्यजीव मंडळाच्या समितीनेही या प्रकल्पाबाबत काही महत्त्वपूर्ण निरीक्षणे नोंदवली आहेत. स्थानिक नागरिकांच्या मनात असलेल्या शंका आणि पर्यावरणाचे रक्षण या दोन्ही गोष्टींचा समतोल राखण्यासाठी केंद्र सरकारने या विषयात हस्तक्षेप करावा,” अशी मागणी खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी केली.



