बसमध्ये चढताना चोराची हातसाफाई ; महिलेच्या पोतातील ३० हजारांचे सोन्याचे डोरले चोरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा बसस्थानकात चोरीची घटना;
गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने उडविले सोन्याचे दागिने
बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने महिलेच्या गळ्यातील काळ्या मण्यांचे पोत तोडून त्यातील सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना देऊळगाव राजा बसस्थानक परिसरात घडली. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौ. रुख्मिणी योगेश तौर (वय ३४, रा. सिंदखेड राजा) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. गुरुवार, ३ जुलै २०२६ रोजी पहाटे १.३० वाजताच्या सुमारास त्या आपल्या पतीसह संभाजीनगर ते अकोला जाणाऱ्या बसमध्ये चढत होत्या. त्यावेळी देऊळगाव राजा बसस्थानक परिसरात गर्दीचा फायदा घेत अज्ञात इसमाने त्यांच्या गळ्यातील काळ्या मण्यांचे पोत तोडले.
या पोतातील सोन्याचे दोन डोरले आणि दोन मणी, असे एकूण सुमारे तीन ग्रॅम वजनाचे दागिने, अंदाजे ३० हजार रुपये किमतीचे, चोरट्याने लंपास केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. घटना लक्षात येताच महिलेने तत्काळ पोलिसांत धाव घेत तक्रार नोंदविली.
या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात कायमी अपराध क्रमांक ३०३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही नोंद पोलीस हेडकॉन्स्टेबल माधव कुटे यांनी घेतली असून, पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल भास्कर सानप यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
देऊळगाव राजा बसस्थानक परिसरात घडलेल्या या घटनेमुळे प्रवाशांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी बसस्थानक परिसरात गर्दीचा फायदा घेत अशा प्रकारच्या चोरीच्या घटना घडत असल्याने पोलिसांनी गस्त वाढवून चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी प्रवासी व नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, पोलिसांनी बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, घटनास्थळावरील हालचाली आणि संशयित व्यक्तींची माहिती याच्या आधारे तपास सुरू केला असून, आरोपीचा लवकरच शोध घेण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.



