ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे आमडी बॅरेज प्रकल्पाला निर्णायक गती

ऑगस्टमध्ये निविदा काढण्याचे जलसंपदा मंत्र्यानी दिले आश्वासन

चांदा ब्लास्ट

आ.मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत मंत्रालयात जलसंपदा मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक

बल्लारपूर तालुक्यातील १० गावांतील २६४२ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार, शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा

मुंबई : चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यातील आमडी बॅरेज प्रकल्पाला निर्णायक गती देण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक (दि.२३ मार्च ) रोजी झाली असून, आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून मंत्रालयात जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत प्रकल्पाच्या तांत्रिक, प्रशासकीय आणि अंमलबजावणीसंबंधी सर्व बाबींवर सविस्तर चर्चा करत शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या तातडीच्या गरजेला प्राधान्य देण्याचा ठोस निर्णय घेण्यात आला. यावेळी जलसंपदा मंत्र्यांनी ऑगस्ट महिन्यात निविदा काढण्याचे स्पष्ट आश्वासन दिल्याने आमडी बॅरेज आता प्रत्यक्ष गती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

बैठकीदरम्यान जलसंपदा मंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेत आमडी बॅरेज प्रकल्पासाठी ऑगस्टमध्ये निविदा प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे या महत्त्वाच्या वर्धा नदीवरील आमडी बॅरेज प्रकल्पाला प्रत्यक्ष कामाची गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली असून बल्लारपूर तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी संबंधित विभागांमध्ये समन्वय साधत प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्याच्या सूचना दिल्या.वर्धा नदीवर आमडी गावालगत प्रस्तावित असलेल्या या मध्यम प्रकल्पामुळे बामणी, दुधोली, दहेली, जोगपूर, कोर्टीमक्ता, आष्टी, कळमना, आमडी, पळसगाव आणि कोर्टी तुकूम या दहा गावांतील सुमारे २६४२ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. यामुळे परिसरातील शेतीला आवश्यक पाण्याचा स्थिर पुरवठा होऊन उत्पादनवाढीस मोठी चालना मिळणार आहे. विशेष म्हणजे पळसगाव–आमडी उपसा सिंचन योजनेचे काम पूर्ण झाल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना दुहेरी लाभ मिळण्याची शक्यता आहे.

आमडी बॅरेज प्रकल्प हा वर्धा नदीवरील बंधाऱ्यांच्या साखळीतील महत्त्वाचा दुवा असून या प्रकल्पाची एकूण साठवण क्षमता ५२.२०५ दलघमी तर एकूण पाणी वापर ८७.७९१ दलघमी इतका प्रस्तावित आहे. या पाण्याचा उपयोग सिंचन, औद्योगिक वापर, पिण्याचे पाणी तसेच बाष्पीभवनासाठी होणार असून परिसराच्या सर्वांगीण विकासाला गती मिळणार आहे.

प्रस्तावित बॅरेजमध्ये १५ बाय ७.५ मीटर आकाराचे एकूण २६ दरवाजे असून बॅरेजची लांबी सुमारे ४८० मीटर असेल.सद्यस्थितीत प्रकल्पाच्या स्थापत्य व यांत्रिक घटकांच्या संकल्पना अंतिम टप्प्यात असून विविध तांत्रिक मान्यतांची प्रक्रिया सुरू आहे. मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग नागपूर यांनी सर्वसाधारण आराखड्यास मान्यता दिली असून पुढील सुधारित आराखडे सादर करण्यात आले आहेत. नदी जलनियंत्रक दरवाजा व संबंधित गेट्सच्या संकल्पनांवरही काम सुरू आहे. उर्वरित तांत्रिक बाबी पूर्ण झाल्यानंतर एप्रिल २०२६ अखेर प्रारूप प्रकल्प अहवाल राज्य तांत्रिक सल्लागार समितीकडे सादर करण्याचे नियोजन आहे.आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आमडी बॅरेज प्रकल्पाला मिळालेली ही गती बल्लारपूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आशादायक ठरत असून, सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागून शेतीला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये