ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘जुन्या आठवणींना उजाळा अन् गुरुजनांचा आदर’

आवाळपूर येथे २००३-०४ बॅचचा स्नेहमिलन सोहळा उत्साहात संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

आवाळपुर :_ माणसाने आयुष्यात कितीही प्रगती केली तरी ज्या शाळेने आपल्याला घडवले, त्या शाळेची ओढ कधीच कमी होत नाही. याचाच प्रत्यय नुकताच आवाळपूर येथे आला. येथील पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयाच्या सन २००३-०४ या शैक्षणिक वर्षातील दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन सोहळा अत्यंत उत्साहात आणि भावूक वातावरणात पार पडला. तब्बल दोन दशकांनंतर एकत्र आलेल्या या मित्रांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला.

संसाराचा गाढा उत्तमपणे चालावा : सुरेश चेकुलवार

या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे आपल्या लाडक्या शिक्षकांचे मार्गदर्शन. याप्रसंगी बोलताना सुरेश चेकुलवार यांनी विद्यार्थ्यांना मोलाचा सल्ला दिला. ते म्हणाले, “शिक्षण पूर्ण करून तुम्ही आता व्यावहारिक जीवनात स्थिरावले आहात. प्रत्येकाने आपापल्या कौटुंबिक आणि सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडत असताना संसाराचा गाढा उत्तमपणे चालवावा. प्रामाणिकपणा आणि कष्टाच्या जोरावर यशस्वी व्हावे.”

गुरुजनांचा सन्मान आणि गौरव

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक नितीन झुरळे होते. प्रमुख अतिथी म्हणून अरुणा दिवे, अशोक राजगडकर, बाबाराव वाभिटकर, सुरेश दुधगवळी, प्रभाकर बोभाटे, दिपक धोपटे, कुरूमदास टेकाम, श्रीराम कुईटे आणि अंकुश काकडे हे शिक्षक वृंद उपस्थित होते. माजी विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सर्व शिक्षकांचा सन्मानचिन्ह देऊन यथोचित सत्कार केला. केवळ शिक्षकांचाच नव्हे, तर उपस्थित असलेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांनाही शिक्षकांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

आठवणींचा पेटारा आणि मनोगते

दहावीच्या बॅचमधील सुमारे १०५ विद्यार्थी या सोहळ्याला उपस्थित होते. अनेक वर्षांनी एकमेकांना भेटल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. कार्यक्रमात मंजुषा पीदुरकर, उषा कुमरे, स्नेहा दहिवले, महेश क्षीरसागर आणि अरुणा चव्हाण यांनी आपल्या विद्यार्थी दशेतील आठवणींना वाट मोकळी करून दिली. शाळेतील मस्ती, शिक्षकांचा धाक आणि मैत्रीचे ते सोनेरी दिवस आठवून उपस्थित सर्वच भावूक झाले होते.

कार्यक्रमाचे अतिशय सुंदर संचालन विद्या शेरकी व सतीश जमदाडे यांनी केले. कार्यक्रमाची रूपरेषा आणि प्रास्ताविक नितीन दळणे यांनी मांडले, तर उपस्थित सर्वांचे आभार पल्लवी जुलमे यांनी मानले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी २००३-०४ बॅचच्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले.

हा केवळ एक सोहळा नसून गुरु-शिष्यांच्या नात्यातील ओलावा आणि निखळ मैत्रीचा उत्सव ठरला. ‘पुन्हा एकदा शाळेत गेल्याचा’ अनुभव घेऊन सर्व विद्यार्थी तृप्त मनाने घरी परतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये