ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

एमआयडीसीतून गोंडपिपरी तालुका औद्योगिक क्रांतीच्या उंबरठ्यावर..!

राज्य शासनाचे अधिकृत राजपत्र प्रसिद्ध ; आमदार देवराव भोंगळे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रशांत डोंगरे

हजारो तरुणांच्या हाताला मिळणार काम

गोंडपिपरी : राजुरा विधानसभेचे आमदार देवराव भोंगळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर मोठे यश आले असून, गोंडपिपरी तालुका आता औद्योगिक क्रांतीच्या उंबरठ्यावर उभा आहे. महाराष्ट्र शासनाने अलिकडेच अधिकृत राजपत्र (गॅझेट) प्रसिद्ध करून गोंडपिपरी तालुक्यातील करंजी, चक पेल्लुर, वडकुली, सिर्सी देऊळवार, चकबेर्डी, बोरगाव, धानापूर, चेक बोरगाव, लिखितवाडा, वढोली, खराळपेठ या १२ गावांतील क्षेत्राला ‘औद्योगिक क्षेत्र’ म्हणून जाहीर केले आहे. यामुळे या भागातील सुशिक्षित बेरोजगार तरुण आणि शेतकरी पुत्रांच्या हाताला रोजगार मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

*संघर्षातून साकारली औद्योगिक स्वप्नपूर्ती*

गोंडपिपरी तालुका सुपीक जमिनींनी समृद्ध असला तरी येथे उद्योगांचा अभाव होता. आमदार झाल्यानंतर देवराव भोंगळे यांनी या प्रश्नाचे गांभीर्य ओळखून शासनाकडे एमआयडीसी स्थापन करण्यासाठी रेटा लावला होता. विधिमंडळाच्या प्रत्येक अधिवेशनात त्यांनी विविध संसदीय आयुधांचा वापर करून उद्योग विभागाचे लक्ष वेधले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पत्रव्यवहार करून आणि भेटी घेऊन या प्रकल्पाची तांत्रिक प्रक्रिया गतिमान केली.

*दादाने वादा पाळला*

२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत आमदार देवराव भोंगळे यांनी गोंडपिपरीच्या जनतेला वचन दिले होते की, निवडून आल्यानंतर या भागात मोठे उद्योग आणून बेरोजगारीचा कलंक पुसून काढू. शासनाने नुकत्याच काढलेल्या राजपत्रामुळे (क्रमांक आयडीसी २०२५/प्र.क्र.५५२/उ-१४) देवराव भोंगळे यांनी आपला वादा प्रत्यक्ष कृतीत उतरवल्याचे सिद्ध झाले आहे. राष्ट्रीय महामार्ग ३५३ बी ला लागून असलेला हा परिसर आता उद्योगांचे केंद्र बनणार आहे.

*१२ गावांतील जमिनी औद्योगिक क्षेत्र घोषित*

यापुर्वी गोंडपिपरी एमआयडीसीचे क्षेत्र केवळ १४ हेक्टर होते परंतू या राजपत्रानुसार ते ३३४१.४८४ हेक्टर झाले असून शासनाच्या अधिसूचनेनुसार करंजी, चक पेल्लुर, वडकुली, चक वडकुली, सिर्सी देऊळवार, चेक बेरडी, बोरगांव, धानापूर, चक बोरगांव, लिखीतवाडा, वढोली आणि खरारपेठ या गावांतील क्षेत्राचा समावेश एमआयडीसीत करण्यात आला आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम १९६१ च्या कलम २ अन्वये हे क्षेत्र आता अधिकृत औद्योगिक क्षेत्र म्हणून विकसित होईल.

*स्थानिक तरुणांना रोजगारात प्राधान्य*

ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी या प्रकल्पासाठी अधिग्रहित झाल्या आहेत, त्यांच्या पाल्यांना आणि परिसरातील उच्चशिक्षित तरुणांना येथे येणाऱ्या नवीन कारखान्यांमध्ये प्राधान्याने नोकऱ्या मिळाव्यात, यासाठी आमदार भोंगळे स्वतः आग्रही आहेत. आगामी नवीन औद्योगिक धोरणात गोंडपिपरीचा विशेष समावेश करून येथे प्रदूषणमुक्त आणि मोठ्या रोजगाराची क्षमता असणारे उद्योग आणण्यासाठी आता त्यांनी आधीपासुनच तयारी सुरू केली आहे.

*एमआयडीसीची स्थापना याचे आत्मिय समाधान – आमदार देवराव भोंगळे.*

राजुरा मतदारसंघाचा आमदार झाल्यापासूनच गोंडपिपरीच्या विकासासाठी आणि इथल्या तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी मी वचनबद्ध होतो. उद्योग विरहीत तालुका म्हणून गोंडपिपरीची असलेली ओळख पुसल्या जावी आणि तालुक्यात एमआयडीसीची स्थापन व्हावी, यासाठी शासनाकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू होता. आज राजपत्राच्या माध्यमातून एमआयडीसीवर शिक्कामोर्तब झाले आहे. आता लवकरच या ठिकाणी देशविदेशातील मोठमोठ्या नामांकित कंपन्यांचे प्लांट उभे राहतील, गोंडपिंपरीच्या अर्थकारणाला चालना मिळून हा भाग विदर्भातील एक प्रमुख औद्योगिक केंद्र म्हणून ओळखला जाईल, असा विश्वास आहे.

अशी प्रतिक्रिया या निर्णयावर बोलतांना आमदार देवराव भोंगळे यांनी व्यक्त केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये