“स्वतःच्या अस्तित्वासाठी धडपडणाऱ्यांनी आम्हाला निष्ठा शिकवू नये
चंद्रपुरात 'शेण' कोणी खाल्ले हे संजय राऊतांना विचारा"- खासदार प्रतिभा धानोरकर यांचा सुषमा अंधारे यांना कडाडून प्रहार

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर :_ ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यावर केलेल्या टीकेला आता अत्यंत धारदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. “ज्यांनी स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी अनेकवेळा कात टाकली आणि जे आपल्या मूळ विचारांशी कधीच एकनिष्ठ राहू शकले नाहीत, त्यांनी आम्हाला निष्ठा आणि नाकाबंदीच्या बाता मारू नयेत,” अशा जळजळीत शब्दांत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी सुषमा अंधारेंचा समाचार घेतला आहे.
सुषमा अंधारे यांच्या विधानाचा तीव्र निषेध करताना खासदार प्रतिभा धानोरकर म्हणाल्या की, “केवळ आणि केवळ प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी आणि ‘लाईमलाईट’ मिळवण्यासाठीच अंधारे यांची ही केविलवाणी धडपड सुरू आहे. मुंबई महानगरपालिकेत कुणी कुणाची नाकाबंदी केली, तिथे भ्रष्टाचाराचे काय व्यवहार झाले आणि कुणी कोणाचे खिसे भरले, याचे उत्तर आधी त्यांनी जनतेला द्यावे. दुसऱ्यांच्या घराकडे दगड फेकण्यापूर्वी आपले स्वतःचे घर काचेचे आहे, याचे भान त्यांनी ठेवावे.”
चंद्रपूरच्या राजकारणात नाक खुपसणाऱ्या अंधारेंना सुनावताना खासदार प्रतिभा धानोरकर यांनी अत्यंत कठोर शब्द वापरले, त्या म्हणाल्या की, “चंद्रपुरात नेमके ‘शेण’ कोणी खाल्ले, हे विचारण्याची हिंमत असेल तर त्यांनी आपले नेते खासदार संजय राऊत यांना विचारावे, म्हणजे त्यांना आरसा दिसेल. वारंवार तोंडघशी पडल्यानंतर एखादे अपघाती यश मिळाले की इतके हुरळून जाऊ नये. अहंकाराची ही सूज लवकरच उतरेल, हे त्यांनी लक्षात ठेवावे. चंद्रपूर महानगरपालिकेत काँग्रेस आजही सर्वात मोठा आणि वरचढ पक्ष आहे, हे विसरण्याची चूक करू नका.”
शेवटी अत्यंत कडक इशारा देताना त्या म्हणाल्या की, “महाविकास आघाडीत राहायचे असेल तर आघाडीचा धर्म आणि घटक पक्षांचा सन्मान राखायला शिका. आमच्या नेतृत्वावर किंवा काँग्रेस पक्षावर विनाकारण चिखलफेक केली, तर गाठ आमच्याशी आहे. जशास तसे उत्तर देण्यास आम्ही समर्थ आहोत. यापुढे तोंड सांभाळून बोला, अन्यथा परिणाम भोगायला तयार राहा.”–



