ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देऊरवाडा परिसरात बिबट्याचा वावर

ग्रामस्थ्यात दहशत : वन विभागाची शोध मोहीम सुरू

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

       चंद्रपूर जिल्ह्यात मानव व वन्यजीव संघर्ष काही नवलाईचा विषय नाही. ताडोबा अभयारण्य नजीक असल्याने तालुक्यातील जंगल व्याप्त परिसरात असंख्य वन्यजीव आश्रयास आलेले आहेत. त्यात खुल्या कोळशा खाणी मुळे माजरी, देऊरवाडा गावाच्या परिसरात कृत्रिम टेकड्या व जंगल निर्माण झाल्याने या परिसरात तृणभक्षी प्राण्यांसह मासभक्षी जंगली प्राण्यांचा वावर वाढू लागला आहे. वाघ, अस्वल बिबट या हिंस्त्र प्राण्यांचे ग्रामस्थांना दिवसाढवळ्या दर्शन होऊ लागल्याने शेतशिवारात काम करणाऱ्या ग्रामस्थ्यात दहशत निर्माण झाली आहे. जंगलातील प्राणी भक्ष्य व पाण्याच्या शोधात मानवी वस्ती कडे वळू लागल्याने वन्यजीव व मानव संघर्ष निर्माण होत आहे.

दिनांक १९ रोजी देऊरवाडा परिसरात बिबट्याची नर व मादी जोडी असल्याचे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले. तात्काळ भद्रावती वनपरिक्षेत्र अधिकारी किरण धानकुटे यांना अवगत केले असता आज त्यांचे मार्गदर्शनात दिनांक २० रोजी क्षेत्रीय सहाय्यक विकास शिंदे यांच्या यांचे नेतृत्वात शोध मोहीम राबविण्यात आली. वृत्त लिहीपर्यंत अजूनही शोध लागला नाही. या शोध मोहिमेत वनपाल संदीप पारवे, किशोर मडावी, तसेच ललित नागपुरे, नितीन राऊत, दिनेश सांगोळे, पवन मांढरे यांनी सहभाग घेतला.

मात्र ग्रामस्थांना आलेल्या प्रत्यक्ष अनुभवामुळे देऊरवाडा परिसरात भीतीयुक्त वातावरण निर्माण झाले असून रोजगार शेतकामे, गुरेढोरे चराई करणारे पशुपालक कमालीचे प्रभावित झाले आहे. तरी सबंधित वनखात्याने गंभीरतेने शोध मोहीम राबवून वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी समोर येत आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी धानकुटे यांनी आम्ही याची विशेष दखल घेतली असून नागरिकांनी सावधगिरी बाळगून वन खात्यास सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये