काँग्रेसकडून गॅस दरवाढ व तुटवड्याविरोधात आक्रोश
तहसीलदारांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
देशभरात वाढत चाललेल्या गॅस सिलिंडर दरवाढीचा आणि तीव्र तुटवड्याचा निषेध करत आज स्थानिक गांधी चौक येथे काँग्रेस पक्षाने केंद्र सरकारविरोधात जोरदार व आक्रमक आंदोलन छेडले. संतप्त कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी केंद्रातील मोदी सरकारच्या धोरणांविरोधात तीव्र घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.
आंदोलनाची सुरुवात महात्मा गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करून करण्यात आली. त्यानंतर आंदोलनाने उग्र रूप धारण करत कार्यकर्त्यांनी “महागाई कमी करा”, “गॅस दरवाढ रद्द करा” अशा घोषणांनी सरकारविरोधात रोष व्यक्त केला. वाढत्या गॅस दरामुळे सामान्य नागरिकांचे आर्थिक कंबरडे मोडले असून, स्वयंपाकासाठी लागणारा गॅस सिलिंडर आज सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला आहे, अशी तीव्र भावना व्यक्त करण्यात आली.
गोंडपिपरी तालुक्यातही गॅस तुटवड्यामुळे नागरिकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे. महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत असून, प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
यावेळी अनेक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका करत, महागाई नियंत्रणात ठेवण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप केला. “जनतेच्या मूलभूत गरजांवरच सरकार घाला घालत आहे,” असा संतापही व्यक्त करण्यात आला.
आंदोलनाच्या शेवटी तहसीलदार शुभम बहाकर यांच्या मार्फत महामहीम राष्ट्रपती यांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात गॅस दरवाढ तात्काळ मागे घ्यावी, तुटवडा त्वरित दूर करावा आणि सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, अन्यथा येत्या काळात आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.
या आंदोलनात तालुका अध्यक्ष अशोक रेचनकर, शहर अध्यक्ष राजू झाडे, महिला तालुका अध्यक्ष सोनी दिवसे, तुकाराम झाडे, देविदास सातपुते, अजय माडुरवार, शंभू येलेकर, गौतम झाडे, नगरसेवक वनिता वाघाडे, रेखा रामटेके, पायल दुर्गे, झाराबाई चांदेकर, विपिन पेद्दुलवार (युवक काँग्रेस अध्यक्ष), श्रीनिवास कंदनुरीवर, दर्शना दुर्गे, विनोद नागपुरे, तुकेश वानोडे, अशोक कुळे, सचिन फुलझेले, राजेश डोंगरे, विनोद जगताप, अनिल झाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राजेश कवठे यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



