कोरपना येथे राष्ट्रीयकृत बँकेची शाखा सुरू करण्यासाठी मागणी
लवकरच राष्ट्रीयकृत बँकेची शाखा सुरू होणार आमदार देवराव दादा भोंगळे यांचे आश्वासन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
कोरपना तालुक्याच्या ठिकाणी एकही राष्ट्रीयकृत बँकेची शाखा नसल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय होत असल्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या गंभीर मुद्द्यावर भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष अमोल आसेकर यांनी पुढाकार घेत आमदार देवराव दादा भोंगळे यांच्याकडे ठोस पाठपुराव्याची मागणी केली आहे.
कोरपना हे तालुक्याचे मुख्यालय असून तेलंगणा राज्य, यवतमाळ जिल्हा आणि जिवती तालुक्याच्या सीमेवरील गावांसाठी मध्यवर्ती बाजारपेठ म्हणून ओळखले जाते. शहरात अनेक शासकीय, निमशासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था, आरोग्य सेवा तसेच सहकारी बँका आणि पतसंस्था असतानाही राष्ट्रीयकृत बँकेचा अभाव ही मोठी विसंगती ठरत आहे.
सध्या नागरिकांना आपल्या बँकिंग व्यवहारांसाठी वनसडी, गडचांदूर, राजुरा, वणी, , चंद्रपूर येथे जावे लागत आहे. त्यामुळे वेळ, पैसा आणि श्रम यांचा मोठा अपव्यय होत असून सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत.
या पार्श्वभूमीवर अमोल आसेकर यांनी देवराव भोंगळे यांना निवेदन देत कोरपना येथे राष्ट्रीयकृत बँकेची शाखा सुरू करण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्याची मागणी केली.
या मागणीची गांभीर्याने दखल घेत आमदार भोंगळे यांनी लवकरात लवकर या प्रश्नावर सकारात्मक निर्णय घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले आहे.



