हिराजी कन्नाके यांचा पुण्यात राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक कन्या शाळा, गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) येथील मुख्याध्यापक हिराजी ब्रम्हानंद कन्नाके यांना त्यांच्या उल्लेखनीय शैक्षणिक कार्याबद्दल राज्यस्तरावर आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हा सन्मान सोहळा दिनांक २९ मार्च २०२६ रोजी पुणे येथे ध्येय फाउंडेशन एज्युकेशन, पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.
शिक्षण क्षेत्रात तब्बल ३६ वर्षे निष्ठेने सेवा देताना हिराजी कन्नाके यांनी विद्यार्थ्यांना व शाळेला दैवत मानून कार्य केले. पगारापेक्षा आणि कुटुंबापेक्षाही विद्यार्थ्यांच्या प्रगतीला प्राधान्य देत त्यांनी झपाटलेल्या शिक्षकाप्रमाणे काम केले. त्यांनी आपल्या सेवाकाळात भोपाल, हैदराबाद, संभाजीनगर, लोणावळा, पन्हाळा, पुणे, डहाणू, धुळे, लातूर व नागपूर येथे विविध शैक्षणिक उपक्रम व प्रशासकीय कौशल्य विषयक प्रशिक्षण घेतले आहे. तसेच जिल्हा व तालुका स्तरावर एकूण २४६ दिवस प्रशिक्षक म्हणून शिक्षकांना मार्गदर्शन केले आहे.
त्यांच्या प्रशासकीय कामकाजाची दखल घेत शिक्षणाधिकारी हरिदास बांबोळे, उपशिक्षणाधिकारी रामराव ओंकार चौहान, बीडीओ काशिनाथ भडके, गटशिक्षणाधिकारी रणदिवे, गणेश चव्हाण व विस्तार अधिकारी विजय परचाके यांनी त्यांचा गौरवपूर्वक सत्कार केला होता.
समाजभिमुख कार्यातही त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. जुनासुरला गावात फिरून भिक्षा मागून शाळेसाठी ९१६ रुपये जमा करून शाळेच्या विकासासाठी प्रयत्न केले. तसेच कबड्डी खेळात जखमी झालेल्या बबन निमसरकर या विद्यार्थ्याला नागपूर येथे नेऊन उपचार करून दिल्याबद्दल शिक्षणाधिकारी अनिल धांडोळे यांनी त्यांचे विशेष कौतुक केले होते.
आपल्या ३६ वर्षांच्या सेवेत त्यांनी ९ वर्षे प्राथमिक शिक्षक, ६ वर्षे मुख्याध्यापक, ६ वर्षे केंद्रप्रमुख आणि १५ वर्षे पदवीधर शिक्षक म्हणून काम केले आहे. सध्या ते जिल्हा परिषद उच्च प्राथमिक कन्या शाळा, गोंडपिपरी येथे मुख्याध्यापक पदावर कार्यरत आहेत. शाळेसोबतच कुटुंबाची जबाबदारीही समर्थपणे सांभाळत त्यांनी आपल्या दोन्ही मुलींना डॉक्टर बनविले आहे.
विशेष म्हणजे ३१ मार्च २०२६ रोजी ते सेवानिवृत्त होत असून सेवानिवृत्तीपूर्वी मिळणारा हा राज्यस्तरीय सन्मान त्यांच्या दीर्घ व समर्पित सेवेला मिळालेली मोठी दाद मानली जात आहे. त्यामुळे गोंडपिपरी परिसरात त्यांच्या या गौरवाबद्दल आनंद व्यक्त केला जात आहे.



