समाधान शिबिरातून नागरिकांच्या समस्या, तक्रारींचे समाधान होईल – आमदार सुमित वानखेडे
वाढोणा येथील शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
शिबिरातून शेतकरी, सर्वसामान्य नागरिकांना विविध सेवांचा लाभ
वर्धा :_ महसूल विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारींचे निवारण आणि शासकीय योजनांचा लाभ एकाच छताखाली मिळवून देण्यासाठी समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या, तक्रारींचे समाधान होईल, असे प्रतिपादन आ.सुमित वानखेडे यांनी केले.
आर्वी तालुक्यातील वाढोना येथे आयोजित समाधान शिबिराचे उद्घाटन आमदार सुमित वानखेडे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी विश्वास शिरसाट, उपविभागीय कृषी अधिकारी श्री.कांबळे, तहसीलदार हरीश काळे, गटविकास अधिकारी प्रदीप चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी श्री.गवारले, तालुका कृषी अधिकारी श्री.उघडे यांच्यासह मंडळातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य सरकार सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत आहे. महसूल विभागाच्या माध्यमातून सातबारा दुरुस्ती, शेत रस्ते व पाणंद रस्ते विषयक मोहीम राबविण्यात येत आहे. त्याबाबत आवश्यक माहिती व मार्गदर्शन शिबिरात मिळणार आहे. यासोबतच विविध शासकीय विभागांच्या योजना नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी स्टॉल उभारण्यात आले असून नागरिकांनी या स्टॉल्सला भेट द्यावी. महसूल विभागाकडून मिळणारे विविध दाखले, आधारकार्ड तयार करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्याचाही लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन आ.सुमित वानखेडे यांनी केले.
महसूल विभाग सर्वसामान्य नागरिकांशी थेट नाळ जुळलेला विभाग आहे. हा विभाग अधिक लोकाभिमुख करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. नागरिकांना एकाच छताखाली विभागाच्या विविध सेवा, सुविधा उपलब्ध करून देऊन शासनाच्या योजना जनतेच्या दारी पोहचवण्याचा प्रयत्न समाधान शिबिराच्या माध्यमातून होत आहे, असे तहसीलदार हरीश काळे यांनी सांगितले.
तहसीलदार यांनी अकृषिक परवानगीबाबतच्या नवीन नियमांची माहिती दिली. आता अकृषिक परवानगीची अट रद्द करण्यात आली आहे. नियोजन प्राधिकरणाने दिलेली बांधकाम परवानगी हीच आता अकृषिक परवानगी म्हणून ग्राह्य धरली जाईल. तसेच दरवर्षी भरावा लागणारा अकृषिक कर आता एकदाच भरावा लागणार आहे. आर्वी तालुक्यातील सर्व महसूल मंडळात समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरातून विविध दाखले, सेवांचा लाभ शिबिरात देण्यात येत आहे, असे तहसीलदारांनी सांगितले.
*विविध प्रमाणपत्र, योजनांच्या लाभ पत्राचे वितरण*
समाधान शिबिरामध्ये आमदार सुमित वानखेडे, उपविभागीय अधिकारी विश्वास शिरसाट, तहसीलदार हरीश काळे यांच्याहस्ते नागरिकांना विविध प्रमाणपत्र आणि शासकीय योजनांच्या लाभ पत्राचे प्रातिनिधिक स्वरूपात वितरण करण्यात आले.
यामध्ये डिजिटल सातबारा, नव्याने नोंद आणि दुरुस्त करण्यात आलेले सातबारा, अंत्योदय कार्ड, राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेचे मंजुरी प्रमाणपत्र, संजय गांधी योजना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. यावेळी विविध शासकीय विभागांच्या स्टॉल्सला मान्यवरांनी भेट दिली.



