देऊळगाव राजा शहरात पालकांची फसवणूक; ‘स्टेट बोर्ड’ची मान्यता, पण ‘CBSE’चे बोर्ड लावून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ!
सामाजिक कार्यकर्ते शेख कदिर यांचा आरोप

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा शहरातील पालकांमध्ये सध्या संतापाचे वातावरण आहे. आपल्या पाल्याला दर्जेदार आणि सीबीएसई (CBSE) पॅटर्नचे शिक्षण मिळावे, या ओढीने पालक हजारो रुपये फी भरून खासगी शाळांमध्ये प्रवेश घेत आहेत. मात्र, देऊळगाव राजा शहरातील काही नामांकित शाळांकडे प्रत्यक्षात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची (State Board) मान्यता असताना, केवळ जाहिरातीबाजी आणि फलकांवर ‘CBSE’ असा उल्लेख करून पालकांची दिशाभूल केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
गेल्या काही वर्षांत पालकांचा कल सीबीएसई बोर्डाकडे वाढला आहे. याच मानसिकतेचा फायदा घेत शहरातील काही शाळा चालकांनी शाळांच्या प्रवेशद्वारावर आणि जाहिरात पत्रकांवर मोठ्या अक्षरात ‘CBSE Pattern’ किंवा ‘Proposed CBSE’ असे लिहून पालकांना भुरळ घातली आहे. प्रत्यक्षात जेव्हा निकालाची किंवा अधिकृत नोंदणीची वेळ येते, तेव्हा या शाळा राज्य मंडळाच्या (SSC) नियमांनुसारच कारभार करत असल्याचे उघड होत आहे.
पालकांच्या खिशाला मोठी कात्री
सीबीएसईच्या नावाखाली या शाळा पालकांकडून अव्वाच्या सव्वा डोनेशन आणि शैक्षणिक फी वसूल करत आहेत. पुस्तके, गणवेश आणि इतर शैक्षणिक साहित्यासाठीही हजारो रुपये उकळले जात आहेत. “आम्ही सीबीएसई बोर्ड समजून प्रवेश घेतला, पण आता कळतंय की ही शाळा तर स्टेट बोर्डाची आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया एका पालकाने नाव न छापण्याच्या अटीवर दिली आहे.
दप्तर तपासणीची गरज आहे: या शाळांमध्ये शिकवली जाणारी पुस्तके ही खरोखरच सीबीएसई संलग्न आहेत का, याची चौकशी होणे गरजेचे आहे.
विनामान्यता ‘CBSE’ शब्दाचा वापर करणे हा कायदेशीर गुन्हा आहे.
: शिक्षण विभागाने अशा शाळांची तपासणी करून त्यांच्या अधिकृत मान्यतेचे बोर्ड शाळेच्या दर्शनी भागात लावणे बंधनकारक करणे आवश्यक आहे.
पालकांनो, ‘अशी’ घ्या काळजी!
कोणत्याही शाळेत प्रवेश घेण्यापूर्वी पालकांनी खालील गोष्टींची खात्री करावी:
१. शाळेकडे ‘Affiliation Number’ (संलग्नता क्रमांक) आहे का?
२. सीबीएसईच्या अधिकृत वेबसाईटवर त्या शाळेचे नाव नोंदणीकृत आहे का?
३. शाळेकडे राज्य सरकारचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ (NOC) आहे का?
या प्रकरणी शिक्षण विभागाने तातडीने लक्ष देऊन अशा बोगस दावे करणाऱ्या शाळांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी देऊळगाव राजा येथील सुज्ञ नागरिकांकडून होत आहे. कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही सामाजिक कार्यकर्ते शेख कदिर यांनी दिला आहे



