ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मानोरा वळणावर हायवा-ट्रकची समोरासमोर धडक : चालक गंभीर जखमी

महिन्याभरात पाचवा अपघात, प्रशासनाच्या दुर्लक्षावर नागरिकांचा सवाल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

        नागपूर-चंद्रपूर राष्ट्रीय मार्गावरील मानोरा वळण रस्त्यावर मंगळवारी सायंकाळी सुमारे ४.४५ वाजताच्या सुमारास हायवा व ट्रक यांची समोरासमोर जोरदार धडक होऊन हायवा चालक गंभीर जखमी झाला. अपघातामुळे काही काळ दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, एमएच ३४ बीझेडबीजी १११७ क्रमांकाचा बांबू भरलेला ट्रक वरोरा येथून भद्रावतीकडे राँग साईडने येत होता. त्याचवेळी एमएच ४९ बीझेड ७४८२ क्रमांकाचा हायवा वरोराकडे जात असताना मानोरा वळणावर दोन्ही वाहनांची समोरासमोर भीषण धडक झाली.

धडक इतकी जोरदार होती की हायवा चालक विनोद जुनघरे (वय ४२, रा. सुमठाना, भद्रावती) हे स्टेअरिंगमध्ये अडकून पडले. त्यांना बाहेर काढण्यासाठी जवळपास एक तास प्रयत्न करावे लागले. अपघातात ट्रकचे समोरील टायर फुटले असून दोन्ही वाहने मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झाली.

अपघात मानोरा वळणावर झाल्यामुळे नागपूर-चंद्रपूर मार्गावरील दोन्ही बाजूंनी वाहतूक बंद झाली आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. जवळपास दीड तासानंतर वाहतूक सुरळीत करण्यात पोलिसांना यश आले. जखमी चालकाला तातडीने चंद्रपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.

दरम्यान, मानोरा वळण रस्ता हा अपघातप्रवण ठिकाण ठरत असून गेल्या महिन्याभरात येथे हा पाचवा अपघात झाला आहे. यापूर्वीच्या अपघातांत दोन जणांचा मृत्यू झाला होता. तरीही प्रशासनाने या धोकादायक वळणाकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये