महिला सक्षमीकरणाच्या अनेक उपक्रमात वर्धा जिल्हा राज्यात अव्वल – पालकमंत्री डॉ.पंकज भोयर
उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांचा ‘पालकमंत्री नारीशक्ती सन्मान’ ; अंगणवाडी सेविका, मदतनिस यांचा कला व सांस्कृतिक महोत्सव

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
महिला व बालविकासच्या 50 पर्यवेक्षिकांना लॅपटॉपचे वितरण
वर्धा : जिल्हा हा राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांची कर्मभूमी आहे. याच मातीने सिंधुताई सपकाळ यांच्यासारखी थोर समाजसेविका देशाला दिली. महिला भगिनी आणि अंगणवाडी सेविकांच्या रक्तातच माणुसकी आणि सेवेचा वारसा आहे. म्हणूनच महिला व बालविकास विभागाच्या महिला सक्षमीकरणाच्या अनेक निर्देशकात वर्धा जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे, असे पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी सांगितले.
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने चरखागृह येथे महिला व बाल कल्याण विभागाद्वारे आयोजित पालकमंत्री नारीशक्ती सन्मान सोहळा व अंगणवाडी सेविक, मदतनिस यांच्या कला व सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्याहस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी वान्मथी सी, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, गिमाटेक मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीच्या संचालक प्रेमलतादेवी मोहता, माईर्स एमआयटी संस्थेच्या विश्वस्त स्वाती कराड (चाटे), अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड, प्रकल्प संचालक वैशाली रसाळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.स्वप्निल बेले, महिला व बालकल्याण अधिकारी मनिषा कुरसंगे आदी उपस्थित होते.
महिला सक्षमीकरणासाठी शासनाने ऐतिहासिक पावले उचलली आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत राज्यातील सव्वा कोटी भगिनींना सक्षम करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे पालकमंत्री डॉ.भोयर यांनी सांगितले. नुकतीच शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहिर केली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात महिला व बालकल्याण विभागासाठी स्वतंत्र कार्यालय सुरू करण्याचा मानसही यावेळी व्यक्त केला. सेलू आणि वर्धा तालुक्यासाठी ही प्रक्रिया सुरू झाली असून, लवकरच आठही तालुक्यांत अशी स्वतंत्र कार्यालये उभारण्यात येतील, असे ते पुढे बोलतांना म्हणाले.
जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस बालकांच्या सुदृढ भविष्यासाठी अहोरात्र काम करत आहेत. तसेच, ‘उमेद’ अभियानांतर्गत महिला बचतगटांची चळवळ जिल्ह्यात अतिशय सक्षमपणे राबविली जात आहे. लवकरच या बचतगटांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी विशेष विक्री केंद्र उमेद मॉलची निर्मिती केली जाणार असल्याचे पालकमंत्री म्हणाले.
प्रशासकीय कामकाजात गती आणण्यासाठी आणि अंगणवाडी पर्यवेक्षिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी गिमाटेक इंडस्ट्रीजच्या माध्यमातून 50 लॅपटॉप वितरित करण्यात आले. प्रेमलतादेवी मोहता यांनी सामाजिक बांधिलकी जपत केलेल्या या मदतीबद्दल पालकमंत्री डॉ. भोयर यांनी विशेष आभार मानले.
स्वातंत्र्य चळवळीच्या कालावधीपासूनच महिला पुढे आल्या आहेत. आज सर्वच क्षेत्रात महिला पुढे असून प्रत्येक क्षेत्रात आपले नावलौकिक करित आहे, असे जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी सांगितले.
देशाच्या विकासात स्त्रीयांचे योगदान मोठे आहे. महिला व पुरुषांना समान संधी उपलब्ध होणे आवश्यक असून अंगणवाडी सेविका आपल्या कामातून नव्या पिढीला घडविण्याचे काम करित आहे. सर्व मिळून सुदृढ व सक्षम भारत घडवूया, असे स्वाती चाटे यांनी आपल्या मनोगतातून सांगितले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, प्रेमलतादेवी मोहता यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
पालकमंत्री डॉ.पंकज भोयर व मान्यवरांच्याहस्ते महिला अधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी सेविका, विद्यार्थीनींचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनिषा कुरसंगे यांनी केले. संचालन व आभार पल्लवी पुरोहित यांनी मानले.
यावेळी अंगणवाडी सेविका, मदतनिस, बचत गटांच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. उद्घाटनानंतर अंगणवाडी सेविका व मदतनिससाठी आयोजित कला व सांस्कृतिक महोत्सवांतर्गत विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. यात महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.



