कारंजा तालुक्यातील ठाणेगाव येथे महाराजस्व समाधान शिबिर
आमदार सुमित वानखेडे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा -1 अंतर्गत कारंजा घाडगे तालुक्यामधील ठाणेगाव महसूल मंडळामध्ये ठाणेगाव येथील जगदंबा माता मंदिर सभागृहात समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन व अध्यक्षस्थानी आ.सुमित वानखेडे होते.
शिबिरामध्ये वनविभागातर्फे 11 लाभार्थ्यांना शेतीच्या नुकसानीच्या भरपाईची मदत देण्यात आली. कारंजा तहसील कार्यालयाकडून जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र असे एकूण 67 प्रमाणपत्रांचे लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले. कृषी विभागाकडून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना, पीएम किसान सन्मान निधी, राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना असे एकूण 5 लाभार्थ्यास शिबिराचा लाभ देण्यात आला.
भुमिअभिलेख विभागाकडून लाभार्थ्यांना नकाशा दुरुस्ती 1 व नकाशा प्रख्यापन 1 लाभ देण्यात आला. आरोग्य विभागातर्फे 10 लाभार्थ्यांना आयुष्मान कार्ड तयार करून देण्यात आले तसेच आरोग्य विभागाच्यावतीने 78 नागरिकांची विविध आरोग्यविषयक तपासणी करण्यात आली. पुरवठा विभागाकडून नवीन रेशनकार्ड 3, दुय्यम शिधापत्रिका 2 असे एकूण 5 प्रकारचा लाभ देण्यात.
महसूल विभागातर्फे 86 सातबारा व 72 आठ-अ उपलब्ध करून देण्यात आले. 12 लाभार्थ्यांना आदेशानुसार वाटणीपत्राचा लाभ देण्यात आला. याप्रमाणे शिबिरात एकूण 400 पेक्षा जास्त लाभार्थ्यांना विविध लाभांचे वाटप करण्यात आले. सर्व लाभार्थ्यांना प्रमाणपत्र व विविध लाभांचे वितरण आ.सुमित वानखेडे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी तहसिलदास, नायब तहसिलदार, विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



