ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नागरिकांनी समाधान शिबिरास उपस्थित राहून योजनांचा लाभ घ्यावा – जिल्हाधिकारी वान्मथी सी

हिंगणी येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सेलू तालुक्यातील हिंगणी येथे समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शासनाच्या सूचनेप्रमाणे जिल्ह्यात प्रत्येक मंडळस्तरावर आयोजित या शिबिरांमध्ये उपस्थित राहून नागरिकांनी महसूलसह विविध शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी यावेळी केले.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसह हिंगणीच्या सरपंच दामिनी डेकाटे, उपविभागीय अधिकारी दिपक कारंडे, तहसिलदार डॉ.शकुंतला पाराजे, संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष अशोकराव मुडे, उपअधीक्षक भूमी अभिलेख अधिकारी दिलीप गर्जे, नायब तहसिलदार मधुकर ठाकरे, कलिंगकुमार किरसान व राजेंद्र मंथनवार, तालुका कृषि अधिकारी श्री.महल्ले उपस्थित होते.

सर्वसामान्यांच्या महसूल विभागाशी संबंधित तक्रारींचे निराकरण तसेच महसूल प्रशासन अधिक गतिमान करण्यासाठी मंडळस्तरावर अभियान राबविण्यात येत आहे. मंडळस्तरावर आयोजित शिबिरास उपस्थित राहून नागरिकांनी योजनांचा लाभ घेतला पाहिजे. विभागांनी देखील जास्तीत जास्त शेतकरी, शेतमजूर यांना लाभ देऊन त्यांच्या प्राप्त तक्रारींचे निराकरण करून शिबीर खऱ्या अर्थाने यशस्वी करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व विभागाच्या अधिकाऱ्याना दिले.

उपविभागीय अधिकारी दिपक कारंडे यांनी शिबिरामध्ये देण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देऊन मार्गदर्शन केले. प्रस्ताविक तहसिलदार डॉ. शकुंतला पाराजे यांनी केले. त्यांनी शिबिरामध्ये देण्यात येत असलेल्या विविध विभागाच्या योजना व लाभार्थ्यांची माहिती दिली. सुरुवातीस जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी शिबिरस्थळी लावण्यात आलेल्या स्टॅालची पाहणी केली. स्टॉलमध्ये संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. शिबिरात विविध विभागांशी संबंधित योजना व सेवांचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांना एकाच छताखाली देण्यात आला.

शिबिरामध्ये विविध विभागाच्या सर्व योजना मिळून एकुण 1561 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला तसेच आरोग्य विभागामार्फत तपासणी शिबिराद्वारे 132 लाभार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. महिला बचतगटांचे सक्षमीकरण करण्याकरिता महिला बचतगटांचे स्टॉल देखील लावण्यात आले होते. शिबिरास सर्व मंडळाचे मंडळ अधिकारी, सर्व ग्राम महसूल अधिकारी, महसुल कर्मचारी, पोलिस पाटील व तालुक्यातील इतर 10 विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपिस्थत होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये