आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त भद्रावतीत विविध कार्यक्रमांचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ नागरिक संघटना, भद्रावती यांच्या वतीने सोमवार, दिनांक ९ मार्च २०२६ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमांतर्गत सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत सर्वांसाठी मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या आरोग्य शिबिरात नागपूर येथील प्रसिद्ध बोकहार्ट हॉस्पिटलचे अस्थिरोग तज्ज्ञ (ऑर्थोपेडिक सर्जन) नागरिकांना मार्गदर्शन व वैद्यकीय सेवा देणार आहेत.
त्यानंतर दुपारी २ ते ५ वाजेपर्यंत महिलांसाठी विशेष मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले असून, या सत्रात प्रख्यात ॲडव्होकेट, डॉक्टर तसेच योगा शिक्षिका महिलांना महिला सक्षमीकरण, आरोग्य व सामाजिक प्रश्नांबाबत मार्गदर्शन करणार आहेत.
याच कार्यक्रमात नवनिर्वाचित महिला नगरसेविकांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच समाजात विविध क्षेत्रांत कार्य करणाऱ्या स्वच्छता कामगार महिला, रिक्षाचालक महिला, वर्तमानपत्र विक्रेता महिला, पोस्टमन, पोळी ताई, घंटागाडी कर्मचारी आदी महिलांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रम ज्येष्ठ नागरिक भवन, पंचायत समिती जवळ, भद्रावती येथे आयोजित करण्यात आला असून, या कार्यक्रमाचा नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन ज्येष्ठ नागरिक संघटना, भद्रावती यांच्या वतीने करण्यात आले आहे.



