तलावांच्या अव्यवस्थित नियोजनामुळे मत्स्य, शिंगाडा व हळद उत्पादक संकटात
भोई समाजाच्या पारंपरिक व्यवसायावर गडद संकट
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती शहर, ज्याला प्राचीन काळी भांदक या नावाने ओळखले जात होते, सुमारे दोन हजार वर्षांच्या समृद्ध इतिहासाची परंपरा लाभलेले शहर मानले जाते. सातवाहन, वाकाटक, यादव, राष्ट्रकूट आणि चालुक्य कालखंडाशी भद्रावतीचा इतिहास जोडला जातो. येथे आढळणाऱ्या प्राचीन शिल्पकला, मूर्ती तसेच जैन, हिंदू आणि बौद्ध धर्मांच्या अवशेषांमधून या प्रदेशाची सांस्कृतिक समृद्धी दिसून येते.
इतिहासानुसार नागवंशीय राजा भंकासिंह यांनी बाराव्या शतकात या नगरीची स्थापना केली होती. येथे असलेले प्रसिद्ध भद्रनाग मंदिर या ऐतिहासिक परंपरेचे प्रमुख प्रतीक मानले जाते. हेमाडपंथी स्थापत्यशैलीत उभारलेले हे मंदिर इ.स. ११४६ मध्ये बांधले गेले असल्याचे मानले जाते.
प्राचीन काळी भद्रावती परिसर जलसंपन्न होता. शहरात सुमारे ३६० तलाव व विहिरी अस्तित्वात होत्या. जलसंपत्तीच्या या विपुलतेमुळे भोई समाज मत्स्य व्यवसाय, शिंगाडा, हळद तसेच टरबूज उत्पादनात आत्मनिर्भर होता. येथील उत्पादनांची इतर भागात निर्यातही केली जात होती.
मात्र सध्या प्रशासनाची उदासीनता, वाढते औद्योगिकीकरण आणि लोकसंख्या वाढ यामुळे हा पारंपरिक व्यवसाय संकटात सापडला आहे. एकेकाळी निर्यात करणाऱ्या या समाजाला आज मासे, शिंगाडा व हळद बाहेरून आयात करावी लागण्याची वेळ आली आहे.
शहरातील दुधाळा, डोलारा, आसना, मल्हारा, अर्जुन वाटिका, विंजासन, पिंडोणी, चिंतामणी, नगराळा, हसरारा आणि कान्हाळा या ऐतिहासिक तलावांवर अतिक्रमण होत असून शहरातील सांडपाणीही मोठ्या प्रमाणावर या तलावांमध्ये सोडले जात आहे. त्यामुळे तलावांचे प्रदूषण वाढून त्यावर अवलंबून असलेल्या भोई समाजाच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम होत आहे.
उपलब्ध माहितीनुसार, भद्रावती तहसीलमध्ये सध्या ४२ तलाव वापरयोग्य स्थितीत आहेत. त्यापैकी १६ तलाव मत्स्य सहकारी संस्थांकडे, २ बचत गटांकडे, १८ खासगी मालकीचे तर १ ग्रामविकास संस्थेकडे आहेत. तसेच ५ तलावांचा लिलाव अद्याप झालेला नाही.
नगरपालिकेच्या चुकीच्या नियोजनामुळे शहरातील बहुतांश सांडपाणी थेट तलावांमध्ये सोडले जात आहे, त्यामुळे मत्स्य, शिंगाडा व हळद उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे. याशिवाय वाढते शहरीकरण आणि बिल्डरांकडून होणारी अतिक्रमणे यामुळे नैसर्गिक जलप्रवाहही अडथळला जात आहे.
परिसरातील कोळसा खाणकामामुळे भूजल पातळीही सातत्याने घटत आहे. त्यामुळे नैसर्गिक जलस्रोत धोक्यात आले आहेत. तरीही प्रशासन व शासन स्तरावर या गंभीर समस्येकडे अपेक्षित लक्ष दिले जात नसल्याची खंत व्यक्त होत आहे.
तज्ज्ञांच्या मते, वेळेत जलसंपत्तीचे योग्य नियोजन व संरक्षण न केल्यास भविष्यात गंभीर पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्याचा परिणाम पर्यावरणीय समतोलाबरोबरच मानव, प्राणी व शेतीवरही होण्याची शक्यता आहे.
“एकेकाळी आत्मनिर्भर असलेला समाज आज अधोगतीकडे वाटचाल करीत आहे. तलावांची घटती संख्या, अतिक्रमण आणि सांडपाणी यामुळे भोई समाज पारंपरिक व्यवसायापासून वंचित होत आहे. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक आहेत.”
— दिलीप मांढरे, वरिष्ठ पत्रकार तथा अध्यक्ष, मच्छिंद्र मच्छुआ सहकारी संस्था, भद्रावती
“आधुनिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी गुणवत्तापूर्ण मत्स्यबीज आणि पुरेशी भांडवलाची उपलब्धता आवश्यक आहे. तसेच शहरातील सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन व तलावांचे संवर्धन याला प्राधान्य देणे गरजेचे आहे.”
— नरेंद्र पढाल, उपाध्यक्ष, विदर्भ विभागीय मच्छीमार संघ, नागपूर


