ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल किरण वाघ यांना राज्यस्तरीय इंडियन एक्सलन्स अवार्ड २०२६ प्रदान 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा :_ येथील पत्रकार किरण वाघ यांना पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय व समाजाभिमुख कार्याची दखल घेत राज्यस्तरीय इंडियन एक्सलन्स अवार्ड २०२६ प्रदान करून गौरविण्यात आले.

दैनिक अहिल्याराज व हिंदी मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती तसेच दैनिक अहिल्याराजच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात हा सन्मान प्रदान करण्यात आला. विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या कर्तृत्वाचा गौरव व्हावा, त्यांच्या कार्याला प्रोत्साहन मिळावे आणि समाजासमोर आदर्श निर्माण व्हावा या उद्देशाने इंडियन एक्सलन्स अवार्ड २०२६ चे आयोजन करण्यात आले होते. या पुरस्कारासाठी राज्यभरातून ऑनलाइन पद्धतीने प्रस्ताव मागविण्यात आले होते. प्राप्त झालेल्या ३९० प्रस्तावांपैकी निवड समितीने विविध निकषांच्या आधारे छाननी करून ७८ कर्तृत्ववान व्यक्तींची निवड केली. त्यामध्ये पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल किरण वाघ यांची निवड करण्यात आली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण सभापती अशांतभाई वानखेडे हे होते. कार्यक्रमाचे उद्घाटन हिंदी मराठी पत्रकार संघाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा धनश्रीताई काटीकर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उद्योजक बाळासाहेब दामोदर, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य प्रा. वैभव आढाव, ज्येष्ठ पत्रकार वीरसिंह दादा राजपूत, वाहतूक नियंत्रक डॉ. प्रदीप गायकी, विद्या विकास विद्यालयाचे प्राचार्य दिलीप आढाव तसेच ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. नेमीचंद धूत यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर आणि भारतातील पहिल्या महिला संपादक तानुबाई बिरजे यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रांतील गुणवंत व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. पत्रकारिता, शिक्षण, सामाजिक, राजकीय, कला, वैद्यकीय, विधी, उद्योग, अभिनय आदी विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना यावेळी इंडियन एक्सलन्स अवार्ड २०२६ देऊन सन्मानित करण्यात आले.

पत्रकारिता क्षेत्रात सातत्यपूर्ण, वस्तुनिष्ठ आणि लोकहिताचे कार्य केल्याबद्दल किरण वाघ यांचा विशेष गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारत सुरवाडे यांनी केले, तर श्रीकृष्ण तायडे यांनी आभार प्रदर्शन केले. किरण वाघ यांना प्राप्त झालेल्या या राज्यस्तरीय पुरस्काराबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये