ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पेंचक सिलाट राज्यस्तरीय स्पर्धेत विठ्ठलवाडातील खेळाडूंचे सुयश

भाग्यश्रीला कांस्य तर रितिकाला रौप्य पदक ; जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात मानाचा तुरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपिपरी :_ तालुक्यातील विठ्ठलवाडा गावातील दोन युवतींनी पेंचक सिलाट राज्यस्तरीय स्पर्धेत दैदिप्यमान कामगिरी करत गावासह चंद्रपूर जिल्ह्याचे नाव राज्यभर उज्ज्वल केले आहे. भाग्यश्री गंगाधर वाग्दरकर हिने कांस्य पदक तर रितिका रविंद्र ताजने हिने रौप्य पदक पटकावत आपल्या गुणवत्तेची चमक दाखविली. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल दोन्ही खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

नाशिक येथे महाराष्ट्र पेंचक सिलाट असोसिएशनतर्फे आयोजित राज्यस्तरीय पेंचक सिलाट स्पर्धा व प्रशिक्षण शिबिरात महाराष्ट्रातील ३२ जिल्ह्यांतील सुमारे ६३० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. भारत सरकारच्या युवा कार्य व क्रीडा मंत्रालय तसेच भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI) यांच्या सहकार्याने ११ ते १३ जूनदरम्यान हे शिबिर पार पडले. विविध वयोगटातील खेळाडूंमध्ये अत्यंत चुरशीच्या वातावरणात सामने रंगले.

या स्पर्धेत विठ्ठलवाडा येथील भाग्यश्री वाग्दरकर, रितिका ताजने आणि खुशाल शंकर पिंपळकर यांनी सहभाग नोंदविला. त्यापैकी भाग्यश्री आणि रितिका यांनी उत्कृष्ट कौशल्य, आत्मविश्वास आणि जिद्दीच्या जोरावर पदक पटकावत विशेष ठसा उमटविला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी राज्यस्तरावर केलेली ही कामगिरी प्रेरणादायी मानली जात आहे.

या यशामागे प्रशिक्षक श्वेतम बुग्गावर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचे खेळाडूंनी सांगितले. तसेच आंतरराष्ट्रीय पेंचक सिलाट खेळाडू व ए-ग्रेड राष्ट्रीय प्रशिक्षक किरणाक्षी येवले यांचे प्रशिक्षण आणि इंडियन पेंचक सिलाट फेडरेशनचे अध्यक्ष किशोर येवले यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन खेळाडूंना लाभले.

तांत्रिक प्रशिक्षण, शिस्तबद्ध सराव आणि प्रोत्साहनामुळे खेळाडूंच्या कौशल्यात मोठी भर पडली असून भविष्यात राष्ट्रीय स्तरावरही उत्तम कामगिरी करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. विठ्ठलवाडा गावातील या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये