ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कांदा बियाणे लंपास करणारे तिघे गजाआड ; ५.२१ लाखांचा मुद्देमाल जप्त 

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची धडाकेबाज कारवाई; जालना-अहिल्यानगरच्या चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा : शहरातील एका उद्योग परिसरातून चोरीस गेलेल्या लाखो रुपयांच्या कांदा बियाणे प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने यशस्वी उलगडा केला आहे. या कारवाईत जालना आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील तिघा आरोपींना अटक करण्यात आली असून, चोरीस गेलेल्या मालासह मोटारसायकली आणि मोबाईल असा एकूण ५ लाख २१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, देऊळगाव राजा येथील भाजीमंडी परिसरातील रहिवासी तथा व्यापारी मोहम्मद अझहर मोहम्मद कलंदर (वय ३६) यांनी २ जून रोजी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यांच्या फिर्यादीनुसार, सिंदखेड राजा रोडवरील पिंपळनेर येथे असलेल्या जूब्बूजी बायोमास ब्रिकेट इंडस्ट्री कंपनीमध्ये अथर्व सीड्स कंपनीचे कांदा बियाणे प्रक्रिया करण्यासाठी ठेवण्यात आले होते. २४ मेच्या रात्री ते २५ मेच्या पहाटेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी १४ बॅगमधील ६ क्विंटल ६५ किलो वजनाचे, सुमारे ४ लाख ६५ हजार ५०० रुपये किमतीचे कांदा बियाणे चोरी करून नेले होते.

या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक आशिष रोही यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.

गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला चोरीचा धागादोरा मिळाला. त्यानंतर १३ जून रोजी जालना, छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये समन्वित कारवाई करण्यात आली. या कारवाईत अंकुश तेजराव खंदारे (वय ४०, रा. सातेगाव, ता. जाफ्राबाद, जि. जालना), विनोद विठ्ठल काळे (वय २९, रा. लोणगाव, ता. भोकरदन, जि. जालना) आणि भानुदास ऊर्फ राहुल बाबुराव गायकवाड (वय ३२, मूळ रा. देऊळगाव राजा, सध्या भारस्करवाडी, शेवगाव, जि. अहिल्यानगर) यांना अटक करण्यात आली.

चौकशीदरम्यान आरोपींनी चोरीची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून ५ क्विंटल ३६ किलो कांदा बियाणे, युनिकॉर्न कंपनीची मोटारसायकल, शाईन कंपनीची मोटारसायकल आणि तीन मोबाईल फोन असा एकूण ५ लाख २१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. विशेष म्हणजे चोरीस गेलेल्या मालापैकी जवळपास संपूर्ण मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. अटक आरोपींना पुढील कारवाईसाठी देऊळगाव राजा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशान्वये, अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा व अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक आशिष रोही, उपनिरीक्षक प्रताप बाजड, पोहेकॉ. शरद गिरी, गजानन दराडे, जगदेव टेकाळे, युवराज राठोड, मनोज खरडे तसेच तांत्रिक विश्लेषण विभागाचे राजू आडवे यांनी या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली..

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये