ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नागपूर येथील कंपनीकडून परवानगीशिवाय बेलसनी येथे पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू

ग्रामस्थांचा आरोप; ग्रामपंचायतीकडे २०० ग्रामस्थांची लेखी तक्रार

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर :_ मौजा बेलसनी येथे में मिलियन स्टील प्रायव्हेट लिमिटेड, नागपूर या कंपनीकडून आवश्यक परवानगी न घेता पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू करण्यात आल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी केला असून याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाकडे लेखी तक्रार सादर करण्यात आली आहे.

ग्रामस्थांच्या माहितीनुसार, सर्वे नं. 34 मधील वर्धा नदीपासून बेलसनी गावातील प्रस्तावित प्लॉटपर्यंत पादण रस्ता तसेच सार्वजनिक रस्त्यावरून पाईपलाईन टाकण्याचे काम दिनांक 25 जानेवारी 2026 रोजी JCB च्या सहाय्याने सुरू करण्यात आले. मात्र संबंधित कामासाठी आवश्यक प्रशासकीय परवानगी घेण्यात आलेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. गावकऱ्यांनी विरोध केल्यानंतर सदर काम तात्पुरते बंद करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.

यानंतर दिनांक 30 जानेवारी 2026 रोजी ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. मात्र त्या ग्रामसभेत कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नाही. पुढील ग्रामसभेची तारीख व वेळ जाहीर करण्यात येईल, असे ग्रामस्थांसमोर सांगण्यात आले होते. तथापि, अद्यापपर्यंत ग्रामसभा आयोजित करण्यात आलेली नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.

दरम्यान ग्रामपंचायत कार्यालयाकडून विनातारीख सूचना फलक लावून 4 मार्च 2026 पर्यंत वैयक्तिक आक्षेप सादर करण्याचे आवाहन करण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. या संपूर्ण प्रकरणात ग्रामस्थांपासून वस्तुस्थिती लपविली जात असल्याची शंका व्यक्त करण्यात येत असून प्रशासनाने याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

सदर प्रकरणी विशेष ग्रामसभा आयोजित करून दिलेली परवानगी रद्द करण्यात यावी तसेच संपूर्ण प्रक्रियेची लेखी माहिती देण्यात यावी, अशी मागणी बेलसनी येथील ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी केली आहे. यासंदर्भात परशुराम निलकंठ लोडे व इतर नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासन तसेच पंचायत समितीकडे निवेदन सादर केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये