ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सावखेड भोई येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराचे उद्घाटन संपन्न 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ संलग्नित श्री गजानन महाराज कृषी व शैक्षणिक संस्था संचालित समर्थ कृषी महाविद्यालय, देऊळगाव राजा जि. बुलढाणा यांच्या राष्ट्रीय सेवा योजना एनएसएस विशेष सात दिवसीय निवासी शिबिराचे उद्घाटन सावखेड भोई येथे उत्साहात संपन्न झाले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव सतीश कायंदे हे होते. प्रमुख उपस्थिती म्हणून दादाराव मुसदवाले गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती देऊळगाव राजा, संजय मुंदानकर मुख्याध्यापक, जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा, सावखेड भोई उपस्थित होते.

कार्यक्रमाची प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन मेहेत्रे यांनी केले. अध्यक्षीय भाषणात सतीश कायंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, ग्रामस्थांकडून शेतीतील अनेक पारंपरिक व उपयुक्त बाबी शिकण्याची ही उत्तम संधी आहे. ग्रामीण भागातील अनुभवसंपन्न शेतकऱ्यांकडून नवनवीन तंत्रे व व्यवहारज्ञान आत्मसात करावे, असे त्यांनी आवर्जून नमूद केले.तसेच विद्यार्थ्यांनीही कृषी क्षेत्रातील विकसित व आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती ग्रामस्थांना करून द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. अशा उपक्रमांमधून समाजकार्याची जाणीव अधिक दृढ होते आणि समाजाप्रती असलेले आपले योगदान प्रभावीपणे पार पाडण्याची संधी मिळते, असेही त्यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले.प्रमुख उपस्थितीत मार्गदर्शन करताना गटशिक्षणाधिकारी दादाराव मुसदवाले यांनी सांगितले की, शालेय व महाविद्यालयीन जीवनात ते स्वतः राष्ट्रीय सेवा योजनेचे सक्रिय सदस्य होते. त्यामुळे एनएसएसच्या विद्यार्थ्यांबद्दल त्यांना विशेष आपुलकी असून त्यांनी विद्यार्थ्यांना मनोगतपूर्वक मार्गदर्शन केले.

जीवनातील मूल्यांची जपणूक करत शेतकऱ्यांप्रती आस्था व आत्मीयता वृद्धिंगत करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. तसेच शेतकऱ्यांच्या अडचणी तळागाळापर्यंत जाऊन समजून घेतल्यास त्यावर प्रभावी उपाययोजना करता येतात, असेही त्यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले.शाळेचे मुख्याध्यापक संजय मुंदनकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आवाहन केले की, राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून सर्व उपक्रमांमध्ये उत्साहाने व जबाबदारीने सहभाग घ्यावा. या शिबिरातून जीवनातील नवनवीन मूल्ये आत्मसात करा, असे त्यांनी सांगितले.तसेच येथे मिळणारे अनुभव आणि शिकवण पुढील व्यावहारिक आयुष्यात निश्चितच उपयुक्त ठरतील, असेही त्यांनी आपल्या मार्गदर्शनात स्पष्ट केले.

राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. योगेश चगदळे व सहकार्यक्रम अधिकारी प्रा. अश्विनी जाधव यांनी शिबिराच्या उद्दिष्टांविषयी माहिती दिली. संतोष टेकाळे, दिलीप चेके, गणेश हांडे, दत्ता जाधव, महेंद्र जाधव, पांडुरंग सोनुने, गजानन शेळके हिम्मत जाधव, भास्कर जाधव, राहुल खंडागळे तसेच प्रा. विकास म्हस्के, प्रा. वैभव देशमुख, सय्यद असिम यांच्यासह राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी, शाळेतील विद्यार्थी व शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.या विशेष निवासी शिबिराच्या माध्यमातून पाणलोट व्यवस्थापन, पडीत जमीन विकास, पर्यावरण, महिला सक्षमीकरण, कृषी -पशु समृद्धी, आरोग्य शिबिर इत्यादी कार्यक्रमांचा समावेश केलेला आहे. ग्रामस्वच्छता, वृक्षारोपण, आरोग्य जनजागृती, शैक्षणिक मार्गदर्शन व विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना समाजाभिमुख कार्यासाठी प्रेरित करत राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तृप्ती मोरे आणि अंकिता काळे हिने केले तर स्वागत गीत WW सिरीज च्या मुलींनी म्हटले.आणि कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन गौरी सोळंकीने केले. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात आणि उत्तम नियोजनासह पार पडला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये