नंदोरी उत्खनन प्रकरण तापले : बैठकीत गोंधळ
शेतकऱ्यांचा न्यायासाठी उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती :_ तालुक्यातील मौजा नंदोरी येथे सुरू असलेल्या मुरूम उत्खननामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या भूमिकेविरोधात नाराजी वाढताना दिसत आहे. शेतकरी संरक्षण समितीच्या वतीने दिलेल्या निवेदनानंतरही ठोस कार्यवाही न झाल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
या संदर्भात उपविभागीय अधिकारी वरोरा यांनी शेतकरी संरक्षण समितीचे अध्यक्ष विठ्ठलराव बदखल, शेतकरी सुनील उमरे (नंदोरी) तसेच शनाई इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या वतीने कालिका द्विवेदी यांना दि. २४ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता बैठकीसाठी पाचारण केले होते. मात्र, बैठकीपूर्वी “बीएलओची बैठक संपल्यानंतर तुम्हाला बोलावण्यात येईल, तोपर्यंत बाहेर थांबा,” असे सांगण्यात आले. त्यानंतर बीएलओ बैठक संपताच उपविभागीय अधिकारी निघून गेल्याने संबंधितांना भेट न मिळाल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
यानंतर शेतकरी संरक्षण समितीचे अध्यक्ष विठ्ठलराव बदखल यांनी तहसीलदार राजेश भांडारकर यांना बैठक घेण्याची विनंती केली. मात्र, प्रकरण उपविभागीय अधिकाऱ्यांकडे असल्याचे सांगत तहसीलदारांनी कोणतीही ठोस कार्यवाही केली नाही. तसेच कंपनीच्या प्रतिनिधीकडूनही कोणतीही समस्या सोडविण्यात आली नसल्याची माहिती समोर आली आहे. अखेर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन सादर केले.
दरम्यान, उपविभागीय अधिकाऱ्यांनी शनाई इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला देऊरवाडा परिसरातील शेतजमिनीत मुरूम उत्खननास परवानगी दिल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, कंपनीवर सुमारे १०० कोटी रुपयांचा अनधिकृत उत्खननाचा दंड प्रलंबित असल्याची माहिती असूनही परवानगी देण्यात आल्याचा आरोप होत आहे. तसेच परवानगीपेक्षा अधिक प्रमाणात अनधिकृत उत्खनन केल्याचीही माहिती स्थानिकांकडून मिळत आहे.
या सर्व प्रकारामुळे संतप्त झालेल्या शेतकरी संरक्षण समितीने हे प्रकरण मा. उच्च न्यायालयात नेण्याचा निर्णय घेतला असून, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढील कायदेशीर लढा उभारला जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. याप्रसंगी भाऊराव खुटेमाटे, विठ्ठल गारसे, प्रकाश उमरे व शेतकरी संरक्षण समिती महिला आघाडी अध्यक्ष शालिनी बदखल हे पीडित शेतकरी उपस्थित होते.
या प्रकरणात प्रशासनाची भूमिका काय राहणार आणि शेतकऱ्यांना न्याय मिळणार का, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.



