कारंजा (घा.) पोलिसांनी उघड केला दुकानातील चोरीचा गुन्हा
नागपूरचा आरोपी अटकेत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
कारंजा (घा.): कारंजा शहरातील येणगाव रोडवरील एका किराणा दुकानाचे शटर वाकवून चोरी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी चोरीला गेलेला मुद्देमाल हस्तगत केला असून गुन्ह्याचा छडा लावला आहे.
घटनेचा तपशील:
फिर्यादी गोपाल माणिकराव कोठारी (रा. वार्ड क्र. १५, कारंजा घा.) यांचे येणगाव रोडवर ‘गोपाल किराणा’ नावाचे दुकान आहे. अज्ञात चोरट्याने दुकानाचे शटर वाकवून आत प्रवेश केला आणि खालील वस्तू लंपास केल्या होत्या: सोयाबीन तेलाचे ५ डबे (किंमत १७,५००/- रुपये), हेअर ऑईलची पेटी (किंमत २,०००/- रुपये) रोख ३,०००/- रुपये असा एकूण २२,५०० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता. याप्रकरणी कारंजा (घा.) पोलीस स्टेशनमध्ये अपराध क्रमांक ०४६/२०२६, कलम ३०५(अ), ३३४(१) भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस कारवाई आणि अटक:
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस स्टेशनच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवली. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपी रेहान उर्फ रज्जाक शेख मुश्ताख शेख (रा. शारदा नगर, छत्रपती चौक, खरबी बहादुरा रोड, नागपूर) याला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्याकडून चोरीला गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त केला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मा.श्री.सौरभ कुमार अग्रवाल साहेब,अप्पर पोलीस अधीक्षक मा.श्री.सदाशिव वाघमारे साहेब,उपविभागीय पोलीस अधिकारी मा. श्री चंद्रशेखर ढोले साहेब यांचे मार्गदर्शनात सपोनि प्रल्हाद मदन, psi सतीश जायभाये, HC/गजानन मरसकोल्हे, PC/दिनेश घसाड,PC/ आशिष कालोकार, PC पुरुषोत्तम कुंभरे यांनी केली आहे.



