पदवीधर मतदारसंघासाठी कोरपना येथे मतदान केंद्र द्या
थिप्पा ते गडचांदूर ४५ किलोमीटरहून अधिक अंतर; मतदानाची टक्केवारी घटण्याची शक्यता

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
कोरपना : पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी तालुक्याचे मुख्यालय असलेल्या कोरपना येथे मतदान केंद्र नसल्याने परिसरातील पदवीधर मतदारांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. मतदानासाठी गडचांदूर येथे जावे लागणार असल्याने कोरपना तालुक्यातील दुर्गम भागातील मतदारांना लांबचा प्रवास करावा लागणार आहे. त्यामुळे कोरपना येथे स्वतंत्र मतदान केंद्र सुरू करण्याची मागणी पुढे येत आहे. कोरपना तालुक्यातील शेवटचे गाव असलेल्या थिप्पा येथून गडचांदूरचे अंतर ४५ किलोमीटरपेक्षा अधिक आहे. त्यामुळे या भागातील पदवीधर मतदारांना मतदानासाठी ये-जा करताना वेळ आणि आर्थिक खर्च सहन करावा लागणार आहे. विशेषतः दुर्गम भागातील मतदारांसाठी ही बाब अडचणीची ठरू शकते. दुसरीकडे, जिवती तालुक्यातील पदवीधर मतदारांसाठीही गडचांदूर येथेच मतदान केंद्र असल्याचे सांगितले जात आहे.
मात्र, जिवती तालुक्यातील येल्लापूर परिसरातील मतदारांना गडचांदूरच्या तुलनेत कोरपना येथे पोहोचणे अधिक सोयीचे ठरू शकते. त्यामुळे भौगोलिक अंतर आणि दळणवळणाच्या सुविधांचा विचार करून मतदान केंद्रांचे नियोजन करण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे. मतदान हा प्रत्येक पात्र मतदाराचा महत्त्वाचा अधिकार आहे. मात्र, मतदान केंद्र दूर असल्यास काही मतदार मतदानापासून वंचित राहण्याची किंवा मतदानाकडे पाठ फिरवण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी मतदानाची टक्केवारीही कमी होऊ शकते. कोरपना हे तालुक्याचे मुख्यालय असल्याने येथे पदवीधर मतदारसंघासाठी मतदान केंद्र उपलब्ध करून द्यावे. यामुळे कोरपना तालुक्यासह जिवती तालुक्यातील येल्लापूर परिसरातील मतदारांची सोय होईल आणि मतदानाचा टक्का वाढण्यास मदत होईल. यासाठी संबंधित निवडणूक यंत्रणेने भौगोलिक परिस्थिती व मतदारांची गैरसोय लक्षात घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे.



