ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देऊळगाव राजा बायपास अपघाताला नवे वळण; आता कारचालकाविरुद्धही गुन्हा दाखल

ट्रकला कारने कट मारून समोर आडवे लावल्याचा आरोप; देऊळगाव राजा पोलिसांत दुसरी फिर्याद

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा : देऊळगाव राजा बायपासवरील संजयनगर परिसरात ११ ऑक्टोबर रोजी झालेल्या ट्रक आणि कारच्या अपघाताला आता नवे वळण मिळाले आहे. या अपघातप्रकरणी आधी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर, आता ट्रकचालकाने दिलेल्या तक्रारीवरून कारचालकाविरुद्धही गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यामुळे या अपघातात दोन्ही वाहनांच्या चालकांनी एकमेकांविरुद्ध तक्रारी केल्याचे समोर आले आहे.

कारचालकाने कट मारल्याचा ट्रकचालकाचा आरोप

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करण संजय कायटे (वय २७, व्यवसाय ट्रकचालक व मालक, रा. चिकनगाव, ता. अंबड, जि. जालना) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. ते एमएच-०४-जीआर-७५०७ क्रमांकाचा लाल-पांढऱ्या रंगाचा १२ चाकी टाटा ट्रक चालवत होते.

फिर्यादीच्या तक्रारीनुसार, ११ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास देऊळगाव राजा बायपासवरील संजयनगर परिसरात एमएच-२१-बीएफ-९६५१ क्रमांकाची पांढऱ्या रंगाची रेनॉल्ट क्विड कार चालविणाऱ्या माधव पंढरीनाथ आढावे यांनी जोरात व निष्काळजीपणे वाहन चालवून ट्रकला कट मारला. त्यानंतर कार ट्रकच्या समोर आडवी लावल्याचा आरोप करण्यात आला आहे.

ट्रकचे नुकसान झाल्याची तक्रार

या घटनेत ट्रकच्या इंजिन ऑईलचा पाइप खराब झाला, समोरील बंपर वाकला आणि उजव्या बाजूची हेडलाईट फुटल्याने वाहनाचे नुकसान झाल्याचे फिर्यादीने तक्रारीत नमूद केले आहे.

भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल

या तक्रारीवरून देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात कायम अपघात गुन्हा क्रमांक ४५८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम २८१ अंतर्गत १३ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री १ वाजून ३ मिनिटांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक मोहन गिते करीत आहेत.

एकाच अपघातात दोन्ही बाजूंच्या तक्रारी

या अपघाताच्या संदर्भात यापूर्वी ट्रकचालक करण कायटे यांच्याविरुद्ध कारला धडक दिल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल झाल्याची नोंद आहे. आता ट्रकचालकाच्या तक्रारीवरून कारचालक माधव आढावे यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे अपघात नेमका कसा घडला, कोणत्या वाहनचालकाची काय भूमिका होती आणि वाहनांचे नुकसान कशामुळे झाले, हे पोलिसांच्या तपासातून स्पष्ट होणार आहे..

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये