नेवजाबाई हितकारिणी कन्या विद्यालय ब्रह्मपुरीची राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेत ऐतिहासिक अजिंक्य गरुडझेप
राष्ट्रीय स्तरावर दोन खेळाडूंची निवड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
ब्रह्मपुरी :- क्रीडा आणि शिक्षणाच्या क्षेत्रात सातत्याने अग्रेसर असलेल्या नेवजाबाई हितकारिणी कन्या विद्यालय, ब्रह्मपुरीच्या विद्यार्थिनींनी पुन्हा एकदा आपल्या अफाट जिद्दीने आणि उल्लेखनीय नैपुण्याने संपूर्ण नागपूर विभागाचे व शाळेचे नाव राज्य पातळीवर उज्वल केले आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे आणि उपसंचालक क्रीडा व युवक सेवा संचालनालय, कोल्हापूर विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर येथील महाराष्ट्र विद्यालयात दिनांक १० ते १२ ऑक्टोबर २०२६ दरम्यान आयोजित राज्यस्तरीय शालेय हँडबॉल क्रीडा स्पर्धेत विद्यालयाच्या १४ वर्षांखालील मुलींच्या संघाने दिमाखदार कामगिरी करीत तृतीय प्राविण्य पटकावले आहे.
या राज्यस्तरीय क्रीडा महासंग्रामणात महाराष्ट्रातील ६ विभागांमधून आलेल्या अत्यंत हुशार व निपुण खेळाडूंनी सहभाग घेतला होता. अशा अटीतटीच्या व चुरशीच्या सामन्यांमध्ये नेवजाबाई हितकारिणी कन्या विद्यालयाच्या संघातील खेळाडूंनी चमकदार खेळ करत तृतीय क्रमांक पटकावून एका ऐतिहासिक यशाला गवसणी घातली. या संघाच्या संपूर्ण प्रवासात खेळाडूंनी दाखवलेली जिद्द, सांघिक समन्वय आणि शिस्त खरोखरच कौतुकास्पद ठरली. या राज्यस्तरीय स्पर्धेत आपल्या खेळाची विलक्षण छाप पाडत उत्कृष्ट नैपुण्य सादर करणाऱ्या पुनम आनंद लांजेवार, संध्या विष्णू दिघोरे दोन गुणवान खेळाडूंची थेट राष्ट्रीय स्तरावरील महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली आहे. या दोन्ही प्रतिभावान विद्यार्थिनींच्या राष्ट्रीय संघातील निवडीमुळे ब्रह्मपुरी तालुक्यासह संपूर्ण नागपूर विभागाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, संपूर्ण परिसरातून या गुणी मैत्रिणींवर अभिनव शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
संघाच्या या उज्ज्वल व प्रेरणादायी कामगिरीची दखल घेत दिनांक १५ ऑक्टोबर २०२६ रोजी संस्थेचे सचिव अशोकजी भैया यांनी राष्ट्रीय खेळाडूंचे प्रत्यक्ष कौतुक केले व त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप-खूप शुभेच्छा दिल्या. त्यांनी आपल्या मार्गदर्शक मनोगतात सांगितले की, विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक प्रगतीपर्यंत मर्यादित न राहता क्रीडा क्षेत्रातही आपले कसब सिद्ध करून शाळेचे आणि राज्याचे नाव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकवावे. तसेच संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती स्नेहलताबाई किसनलालजी भैया, शाळेच्या मुख्याध्यापिका बनपूरकर मॅडम, उपमुख्याध्यापक निखारे सर आणि पर्यवेक्षिका खंडाते मॅडम यांनी सर्व खेळाडूंचे तोंडभरून कौतुक केले असून, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे.
या दैदिप्यमान यशामागे शाळेला मिळालेले खमके आणि तज्ज्ञ मार्गदर्शकांचे सहकार्य अत्यंत मोलाचे ठरले आहे. राष्ट्रीय हँडबॉल खेळाडू सुरजजी मेश्राम, राष्ट्रीय हँडबॉल खेळाडू शुभम जंगले, क्रीडा प्रशिक्षक भारती मॅडम आणि बारेकर सर यांचे सखोल व कसदार मार्गदर्शन या विद्यार्थिनींना लाभले. याशिवाय, शाळेतील सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि जागरूक पालकवर्गाचे निरंतर प्रोत्साहन व सहकार्य लाभल्यामुळेच नेवजाबाई हितकारिणी कन्या विद्यालयाने हे यश संपादन केले आहे. या मुलींच्या यशामुळे ब्रह्मपुरीच्या क्रीडा वर्तुळात सध्या उत्साहाचे व आनंदाचे वातावरण पसरले आहे.



